सौदी अरेबियाच्या प्रिन्सकडून इम्रान खान यांचा अपमान, अर्ध्यातून विमान परत बोलावलं
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांना मैत्रीखातर न्यूयॉर्कला जाण्यासाठी आपलं शाही विमान दिलं. मात्र इम्रान खान यांच्या राजकीय कुटुनितीमुळे सौदी अरेबियाचे प्रिन्स नाराज झाले आणि त्यांनी शाही विमानातून पाकिस्तानच्या सदस्यांना बेदखल करण्याचे आदेश दिले.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघांच्या आमसभेत सौदी अरेबिया विरुद्ध भूमिका घेतल्याने इम्रान खान यांना मोठा अपमान सहन करावा लागल्याचं कळतंय. न्यूयॉर्कवरुन पाकिस्तानला परतताना सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी इम्रान खान यांना आपल्या विमानातून उतरवल्याचा दावा पाकिस्तानातील वृत्तपत्र 'फ्रायडे टाईम्स'ने केला आहे.
संयुक्त राष्ट्र संघांच्या आमसभेसाठी जाण्याआधी इम्रान खान सौदी अरेबिया येथे गेले होते. पाकिस्तानची ढासळलेल्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान प्रवासी विमानाने पुढील प्रवास करणार होते. मात्र सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांना मैत्रीखातर न्यूयॉर्कला जाण्यासाठी आपलं शाही विमान दिलं.
मात्र संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरच्या मुद्द्यावरून समर्थन न मिळाल्याने इम्रान खान यांनी आपल्या राजकीय कुटनितीत बदल केला. मलेशियाचे पंतप्रधान महातर मोहम्मद आणि तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसिप तय्यब एर्डोगन यांच्या साथीने इम्रान खान यांनी पाकिस्तानला इस्लामिक देशांच्या प्रतिनिधीच्या रुपाने स्वत:ला समोर ठेवलं. मात्र या कुटुनितीमुळे सौदी अरेबियाचे प्रिन्स नाराज झाले आणि त्यांनी शाही विमानातून पाकिस्तानच्या सदस्यांना बेदखल करण्याचे आदेश दिले.
सौदी अरेबियाला पाकिस्तानची चाल लक्षात आली, तोपर्यंत इम्रान खान शाही विमान घेऊन निघाले होते. मात्र नाराज सौदी अरेबियाच्या प्रिन्सने विमान माघारी फिरवण्याचे आदेश दिले. त्यानंतर इम्रान खान यांना सामान्य प्रवासी विमानातून इस्लामाबादला परतावं लागलं होतं. मात्र डॅमेज कन्ट्रोल करत पाकिस्तान सरकारने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने इम्रान खान प्रवासी विमानाने इस्लामाबादला पोहोचले, अशी माहिती दिली.