Pakistan : पंजाब प्रांतामध्ये दररोज अत्याचाराच्या 4-5 घटना, वाढत्या प्रकरणांमुळे 'आणीबाणी' लागू
Emergency in Pakistan : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे आणीबाणी (Emergency) लागू केली आहे.
Emergency in Pakistan : भारताशेजारील देश पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या (Rape) घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. यामुळे प्रशानानं पंजाब (Punjab) प्रांतामध्ये आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. पंजाबचे गृहमंत्री अता तरार (Attaullah Tarar) यांनी रविवारी सांगितलं की, ‘पंजाबमधील बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लागू करण्यात येत आहे.’
गृहमंत्र्यांनी पुढे सांगितलं की, पंजाबमध्ये महिला आणि मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही प्रशासनासाठी गंभीर बाब आहे. ‘डॉन’ वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) च्या मुख्यालयात प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की, पंजाब प्रांतामध्ये दररोज सुमारे चार ते पाच प्रकरण समोर येत आहेत. यामुळे सरकारकडून लैंगिक छळ, अत्याचार आणि यासारख्या प्रकरणांना सामोरं जाण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा विचार सुरु आहे.'
कॅबिनेट समिती प्रकरणांचा आढावा घेणार
कायदा मंत्री मलिक मुहम्मद अहमद खान यांच्या उपस्थितीत मंत्री तरार यांनी माहिती दिली की, बलात्कार आणि कायदा आणि सुव्यवस्थेवरील कॅबिनेट समितीद्वारे सर्व अत्याचाराच्या घटनांचा आढावा घेतला जाईल आणि अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी नागरी संस्था, महिला हक्क संघटना, शिक्षक आणि वकील यांचाही सल्ला घेतला जाईल.
अनेक प्रकरणांत आरोपींना ताब्यात घेण्यात आले
गृहमंत्री तरार यांनी नागरिकांनी त्यांच्या मुलांना सुरक्षिततेचं महत्त्व शिकवावं आणि मुलांना कुठेही एकटे सोडू नये, असं आवाहन केलं आहे. मंत्र्यांनी सांगितलं आहे की, 'अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून लैंगिक छळाबाबत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जागरुक केलं जाईल. सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि मोहिमा सुरू केल्या आहेत.'