Pakistan Politics Crisis: पाकिस्तानमध्ये विरोधकांनी नॅशनल असेंब्लीवर केला कब्जा, निवडला नवीन पंतप्रधान
Pakistan: पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला असून संसदही बरखास्त करण्यात आली आहे.
Pakistan: पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला असून संसदही बरखास्त करण्यात आली आहे. त्याचवेळी नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्ष अजूनही उपस्थित असून त्यांनी स्वत: शाहबाज शरीफ यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. इम्रान खान यांनी संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री फारुख हबीब यांनी सांगितले की, निवडणुका 90 दिवसांत होतील. या 90 दिवसांसाठी इम्रान खान काळजीवाहू पंतप्रधान असतील. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांनी रविवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सूचनेनुसार नॅशनल असेंब्ली विसर्जित केली. याच्या काही मिनिटांपूर्वी सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या खान यांनी त्यांना नव्याने निवडणुका घेण्याचा सल्ला दिला होता.
पाकिस्तानमध्ये नक्की काय घडत आहे?
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री फारुख हबीब म्हणाले की, राष्ट्रपती अल्वी यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार नॅशनल असेंब्ली विसर्जित केली आहे. 90 दिवसांत निवडणुका होतील, असे ते म्हणाले. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, पंतप्रधान इम्रान खान हे संविधानाच्या कलम 224 अंतर्गत त्यांचे कर्तव्य बजावत राहतील. मंत्रिमंडळ विसर्जित करण्यात आले आहे. अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान आता निवडणुकीपर्यंत हंगामी पंतप्रधान राहतील. याच दरम्यान संसदेत विरोधक जोरदार निदर्शने करत आहेत. विरोधकांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
विरोधी पक्ष संसदेत पोहोचल्यावर काय झालं
विरोधी पक्षाचे सदस्य जेव्हा संसदेत पोहोचले तेव्हा ते अविश्वास ठराव तेच जिंकणार असं निश्चित करून आले होते. मात्र हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर त्यांनी या निर्णयाला विरोध केला. खान यांची सरकारमधून हकालपट्टी करण्यासाठी विरोधकांना 342 पैकी 172 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे, तर त्यांना 177 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खान 2018 मध्ये 'नया पाकिस्तान' निर्माण करण्याचे वचन देऊन सत्तेवर आले आणि आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. कारण त्यांचा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने बहुमत गमावले आहे. त्यांच्या दोन मित्रपक्षांनीही सरकारचा पाठिंबा काढून विरोधी पक्षांशी हातमिळवणी केली. अशातच आता पाकिस्तानमध्ये रोज नवीन राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे.