Mexico Mass Shooting : धार्मिक उत्सवात अंदाधुंद गोळीबार, लोकांच्या किंचाळ्या अन् धावपळ, 12 जणांचा मृत्यू, भयावह व्हिडीओ समोर
Mexico Mass Shooting : अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. तर एकूण 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Mexico Mass Shooting : मेक्सिकोमधील (Mexico) इरापुआटो शहरात बुधवारी 25 जून रोजी रात्री उशिरा, झालेल्या एका समारंभादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात (Shooting) 12 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. या घटनेत जखमी झालेल्या 20 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती हिंसाचारग्रस्त ग्वानाहुआटो (Guanajuato) राज्यातील अॅटर्नी जनरल कार्यालयाने दिली आहे.
'नेटिव्हिटी ऑफ जॉन द बॅप्टिस्ट' या कॅथोलिक सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात लोक नाचत असताना अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच अचानक गोळीबाराचे आवाज येताना दिसतात, आणि त्यानंतर लोकांच्या भीतीने दिलेल्या किंकाळ्या ऐकू येतात. तसंच, जीव वाचवण्यासाठी लोकांची एकच धावपळ सुरू झाल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसून येते.
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांकडून शोक व्यक्त
दरम्यान, या हल्ल्यात मृतांची संख्या 12 वर पोहोचली असून, सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. या भीषण घटनेवर प्रतिक्रिया देताना मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबाम यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. "ही अतिशय दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
👇🚫⚠️OTRA MASACRE ENCIENDE LAS ALARMAS EN #GUANAJUATO,
— Corresponsales MX (@CorresponsalsMX) June 25, 2025
▶️SUBE A 12 EL NÚMERO DE MUERTOS TRAS ATAQUE ARMADO DURANTE UNA FIESTA PATRONAL EN LA COLONIA BARRIO NUEVO EN #IRAPUATO
▶️Las personas celebraban a #SanJuan con musica de banda, y juegos mecánicos, cuando llegaron los… pic.twitter.com/XbuATDU5xB
ग्वानाहुआटोमध्ये वर्षभरात 1,435 हत्या
ग्वानाहुआटो हे मेक्सिकोमधील सर्वात हिंसाचारग्रस्त राज्यांपैकी एक मानले जाते. गेल्या महिन्यातही, ग्वानाहुआटोमधील सॅन बार्टोलो डे बेरिओस येथे कॅथोलिक चर्चने आयोजित केलेल्या एका पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मंगळवारी ग्वानाजुआटोच्या इतर भागांमध्येही वेगवेगळ्या हत्यांच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या अटर्नी जनरलच्या कार्यालयाने दिली आहे. मेक्सिको सिटीच्या वायव्य दिशेला असलेले हे राज्य संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वासाठी सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाचे केंद्रबिंदू ठरले आहे. या वर्षात आत्तापर्यंत ग्वानाहुआटोमध्ये 1,435 हत्या झाल्या असून, हा आकडा देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























