The Losses We Share | डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्कलचा गर्भपात
The Losses We Share | न्यूयॉर्क टाईम्समध्ये 'द लॉस वी शेअर' या मथळ्याखाली लिहलेल्या एका लेखात मेगन मर्कलने आपल्याला गर्भपातामुळे मुल गमवावं लागल्याचे सांगितलंय. तो अनुभव आपल्यासाठी असह्य शोक असल्याची भावना तिने व्यक्त केली.
डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्कल एक विस्तृत लेख लिहून तिला गर्भपाताला सामोरं जावं लागल्याचं उघड केलं आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये 'द लॉसेस वी शेअर' या मथळ्याखाली लिहलेल्या एका लेखात 39 वर्षीय मर्कलने जुलैमध्ये गर्भपात करावा लागल्याने आपल्याला दुसरे मुल गमवावे लागल्याची खंत व्यक्त केली.
ही बातमी गेले काही महिने गुपित होती पण आता यासंदर्भात डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्कलने लेख लिहून ती उघड केली आहे. ती घटना घडली तेव्हा तिला आणि तिच्या कुटुंबियांना कोणत्या मानसिकतेतून जावं लागलं हे सविस्तरपणे तिने लिहलंय.
"मी माझ्या पहिल्या मुलाला घट्ट पकडत असताना दुसऱ्या मुलाला गमवत होते" असं तिने लिहलंय.
गर्भपाताचे दु:ख
डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्कलने तिच्या लेखात सांगितले की तिने इतरांप्रमाणे त्या दिवसाची सुरुवात केली. अचानक तिच्या पोटात दुखू लागले आणि तिला जाणवले की आपण आपल्या पोटातल्या मुलाला गमवतोय.
ती लिहते की, "इतर सामान्य दिवसासारखी ती जुलै महिन्याची एक सकाळ होती. नाश्ता बनवने, कुत्र्यांना खाऊ घालने, व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणे अशा प्रकारे तो दिवस सुरु झाला. मुलाचे डायपर बदलताना अचानक माझ्या पोटात वेदना सुरु झाल्या. त्यामुळे मी जमिनीवर आदळले. मी माझ्या पहिल्या मुलाला दोन्ही हातात घट्ट पकडले होते आणि त्यावेळी मला जाणवले की मी माझ्या दुसऱ्या मुलाला गमवत आहे."
तिने पुढे लिहलंय की, "काही काळानंतर जेव्हा माझे डोळे उघडले त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये असल्याची जाणीव झाली. मी माझ्या पतीचे हात घट्ट पकडले होते. आमच्या दोघांचेही डोळे पानावले होते. त्यावेळी मी हॉस्पिटलच्या पांढऱ्या भिंतीकडे शुन्यात पाहत असल्यासारखे पाहत होते. आम्ही काय गमावलं याची जाणीव आम्हा दोघांनाही झाली होती."
तू ठिक आहेस का?
मर्कल पुढे लिहते की, "त्यावेळी मला आमच्या गेल्या वर्षीच्या दक्षिण आफ्रिकेच्या सहलीची आठवण आली. फिरुन आल्यानंतर मी खूप दमले होते आणि माझ्या मुलाला दुध पाजत होते. त्यावेळी एका पत्रकाराने विचारले की तू ठिक आहेस का? त्यावेळी मी उत्तर दिले की मला अशा प्रकारचा प्रश्न जास्त कोणी विचारत नाही की तू ठिक आहेस का, माझी चौकशी केल्याबद्दल धन्यवाद"
ती लिहते की, "कठीण प्रसंगी तू ठिक आहेस का हा प्रश्न विचारणे किती महत्वाचा असतो याची मला जाणीव झाली."
"त्यावेळी मला जाणवले की मुल गमावल्यानंतर माझ्या पतीच्या चेहऱ्यावर किती वेदना आहेत. अशा वेळी तू कसा आहेस हे विचारणे मला जास्त उचित वाटले." अशीही आठवण डचेस ऑफ ससेक्सने सांगितली आहे.
ती पुढे लिहते की, "हे वर्ष आमच्यासाठी खूपच वेदनादायी होते. आलेल्या अडचणींना आम्ही तोंड दिले, त्या विरोधात लढलो. मुल गमावणे म्हणजे जवळजवळ असह्य शोक आहे. ही वेदना अनेकांनी अनुभवली असेल, पण खूप कमी लोकांनी ती व्यक्त केली आहे. त्यावेळी मला आणि माझ्या पतीला जाणवले की त्या शंभर जणांच्या हॉस्पिटलमध्ये दहा ते बारा जणांना गर्भपाताला सामोरं जावं लागलं असेल."
अनेक घटनांची नोंद
डचेस ऑफ ससेक्सने आणखीही काही घटनांचा उल्लेख केला आहे. कोरोनाकाळात कसे एका महिलेने तिच्या आईला गमावले, कशा प्रकारे एका व्यक्तीला मृत्यूला सामोरं जावं लागले याचीही नोंद तिने लेखात घेतली आहे.
डचेस ऑफ ससेक्सने आपल्या लेखात 26 वर्षीय आफ्रिकन-अमेरिकन ब्रेयोना टेलर आणि जार्ज फ्लाएड यांना गोऱ्या पोलीसांनी कसे मारले या घटनांचा उल्लेखही केला आहे. ती म्हणते की, "शांततापूर्ण चाललेलं आंदोलन अचानक हिंसक बनलंय, आरोग्यदायी वातावरण अचानक रोगट बनलंय आणि ज्या ठिकाणी एकेकाळी सर्व समाज एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत होता त्या ठिकाणी भेदभाव आणि एकमेकांबद्दलचा तिरस्कार वरचढ झाला आहे."
आपल्या लेखाचा शेवट करताना डचेस ऑफ ससेक्स लिहते की, "आपण आता नवं जगणं अंगवळणी पाडायला सुरु केलंय. ज्यात आपले चेहरे मास्कने झाकलेले आहेत पण त्यामुळे आपल्याला एकमेकांच्या डोळ्यात पाहणं बंधनकारक झालंय. अनेक वेळा त्या डोळ्यांत आनंद असतो तर काही वेळे ते अश्रूंनी डबडबलेले असतात. खूप काळानंतर, मानवतावादी दृष्टीकोनातून आपण एकमेकांकडे पाहत आहोत. "