Medicine Nobel Prize 2023 : वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यंदाचे मानकरी
Medicine Nobel Prize 2023 : वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील 2023 सालचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
मुंबई : यंदाच्या वर्षातील वैद्यकशास्त्राच्या (Physiology) नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) घोषणा करण्यात आली आहे. कॅटालिन कॅरिको (Katalin Karikó) आणि ड्र्यू वेइसमन (Drew Weissman) हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. न्यूक्लिओसाइड आधारित बदलांशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या याच शोधामुळे जागतिक महामारी ठरलेल्या कोविड-19 विरुद्ध प्रभावी ठरलेली mRNA लस विकसित करणे शक्य झालं.
त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण निष्कर्षांद्वारे, mRNA ही लस आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी कशा पद्धतीने काम करते याबाबत माहिती मिळवण्यास मदत झाली आहे. दर जो काळ मानवी जीवनासाठी अत्यंत कठीण ठरला त्या काळामध्ये एक महत्त्वपूर्ण लस विकसित करण्यासाठी कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेइसमन यांनी अभूतपूर्व योगदान दिले. त्यांच्या या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दखल घेण्यात आली. त्यामुळे त्यांना 2023चा वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार देण्यात आलाय.
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 2, 2023
The 2023 #NobelPrize in Physiology or Medicine has been awarded to Katalin Karikó and Drew Weissman for their discoveries concerning nucleoside base modifications that enabled the development of effective mRNA vaccines against COVID-19. pic.twitter.com/Y62uJDlNMj
का दिला जातो नोबेल पुरस्कार ?
वर्षभरात मानवतेसाठी मोलाचं कार्य करणाऱ्यांना नोबेल पुरस्कारांनी गौरविण्यात येतं. हा पुरस्कार अनेक क्षेत्रांमध्ये दिला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाइटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
अल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या कमाईचा बहुतांश भाग हा नोबेल पुरस्काराच्या फंडसाठी दिला होता. तर पहिल्यांदा नोबेल पुरस्कार हा 1901 मध्ये देण्यात आला होता. दरम्यान 1968 मध्ये सेंट्रल बँक ऑफ स्वीडनने इकॉनॉमिक सायन्सेस हा आणखी एक वर्ग या पुरस्कारांसाठी जोडला. तर जगातला हा सर्वात श्रेष्ठ दर्जाचा पुरस्कार असल्याचं म्हटलं जातं. अनेक दिग्गज व्यक्ती या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
नोबेल पुरस्कार विजेत्यांना काय मिळतं?
नोबेल पारितोषिक विजेत्यांना डिप्लोमा, एक पदक आणि 10 दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजेच सुमारे 757,64,727 रुपये इतकी रोख रक्कम दिली जाते. जर एका वर्गामध्ये एकापेक्षा जास्त विजेते असल्यास, बक्षीस रक्कम ही त्यांच्यामध्ये विभागली जाते. अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 10 डिसेंबर रोजी विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातात.