Sri Lanka Crisis: श्रीलंकेत मोठं राजकीय -आर्थिक संकट, 'या' देशांनी पुढे केला मदतीचा हात
Help For Sri Lanka: आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या श्रीलंकेत नागरिक आता रस्त्यावर उतरत निदर्शने करत आहेत. हा विरोध इतका तीव्र झाला की येथील नागरिकांनी राष्ट्रपती भवनावरच ताबा मिळवला.
Help For Sri Lanka: आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या श्रीलंकेत नागरिक आता रस्त्यावर उतरत निदर्शने करत आहेत. हा विरोध इतका तीव्र झाला की येथील नागरिकांनी राष्ट्रपती भवनावरच ताबा मिळवला. सतत आंदोलने आणि गदारोळ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. देशात आणीबाणी लागू आहे. शहरांमध्ये संचारबंदी लागू आहे. श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याच्या निर्णयानंतर लगेचच निवडणुका जाहीर झाल्या आहेत. श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. तर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देखील 13 जुलै रोजी राजीनामा देणार आहेत.
या सर्व परिस्थितीवर अनेक देशांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, चीन आणि जपानचा समावेश आहे. श्रीलंकेतील सध्याच्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, भारत आणि श्रीलंका यांचे द्विपक्षीय संबंध चांगले आहेत. तर भारताच्या वतीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, ''काँग्रेस पक्ष या गंभीर संकटाच्या वेळी श्रीलंका आणि तेथील जनतेच्या पाठीशी उभा आहे. आम्हाला आशा आहे की भारत सरकार श्रीलंकेच्या लोकांना आणि सरकारला मदत करत राहील. काँग्रेस पक्ष आंतरराष्ट्रीय समुदायाला श्रीलंकेला सर्व शक्य मदत आणि पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.''
दुसरीकडे अमेरिकेने श्रीलंकेच्या नेत्यांना आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी आग्रह केल्याचे म्हटले आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता राजकीय संकटही चांगलेच तापले आहे. यानंतर अमेरिकेने रविवारी श्रीलंकेच्या नेत्यांना देशाला लवकरात लवकर स्थिर करण्यासाठी काही मोठी पावले उचलण्याचे आवाहन केले. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते अँटनी ब्लिंकन म्हणतात की, श्रीलंकेच्या जनतेने त्यांच्याच अध्यक्षांना त्यांच्या निवासस्थानातून बाहेर काढले आहे. आता त्यांच्या राजीनाम्याची घोषणा करताना नवीन सरकारने श्रीलंकेमध्ये दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी शक्य तितक्या लवकर मोठे निर्णय घेण्याची गरज आहे. श्रीलंकेतील नवीन सरकारने राजकीय संकट वाढण्याआधी आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी उपाय शोधून त्यावर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे. ज्यामुळे देशाला दीर्घकाळ आर्थिक स्थैर्य मिळू शकेल.
तर चीनने आपल्या नागरिकांनी श्रीलंकेतील निदर्शनांमध्ये सहभागी होऊ नये, असे म्हटले आहे. श्रीलंकेबद्दल आपल्याला सहानुभूती असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने म्हटले आहे की, श्रीलंकेतील विविध वांशिक गट आणि विविध क्षेत्रांतील लोकांना चीन विविध माध्यमांचा वापर करून आपत्कालीन गरजा पुरवत आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत श्रीलंकेला मदत करत राहील, असे चीनने म्हटले आहे.
याशिवाय जपाननेही श्रीलंकेच्या मदतीचा हात दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत जपान श्रीलंकेला त्याच्या आर्थिक कार्यक्रमासाठी आणि देशाच्या विकास कार्यासाठी मदत करण्यास तयार आहे. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे जपानने म्हटले आहे. जपान सरकारने श्रीलंकेतील लोकांना औषधे आणि अन्न पुरवण्यासाठी युनिसेफ आणि WFP मार्फत तीन मिलियन अमेरिकी डॉलर्सची आपत्कालीन मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Sri Lanka Protests Timeline : जनतेच्या विरोधानंतर श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा राजीनामा, नक्की काय घडलं? घटनाक्रम जाणून घ्या...
Sri Lanka protest : आंदोलक आक्रमक, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचेल खासगी घर पेटवले