Mahatma Gandhi Statue Defaced : कॅनडात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, भारतीय दूतावासाकडून कठोर कारवाईची मागणी
Mahatma Gandhi Statue Defaced : यॉर्क प्रादेशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योंगे स्ट्रीट आणि गार्डन अव्हेन्यू परिसरातील विष्णू मंदिरातील पाच मीटर उंच मूर्तीची विटंबना करण्यात आली.
Mahatma Gandhi Statue Defaced : कॅनडातील (Canada) रिचमंड हिल (Richmond Hill) येथे असलेल्या एका हिंदू मंदिरातील (Hindu Temple) महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi statue)पुतळ्याची छेडछाड करण्यात आली. हा द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास केला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यॉर्क प्रादेशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योंगे स्ट्रीट आणि गार्डन अव्हेन्यू परिसरातील विष्णू मंदिरातील महात्मा गांधींच्या पाच मीटर उंच मूर्तीची विटंबना करण्यात आली. दुपारी 12.30 च्या सुमारास अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
पुतळ्याची विटंबना
यॉर्क प्रादेशिक पोलिसांचे प्रवक्ते एमी बौड्रेउ म्हणाले की, कोणीतरी "ग्राफिक शब्दांसह" पुतळ्याची विटंबना केली. मूर्तीवर खलिस्तानही लिहिलेले असल्याचे त्यांनी सांगितले. "यॉर्क प्रादेशिक पोलीस द्वेषाचे गुन्हे कोणत्याही स्वरूपात सहन करत नाहीत," ते म्हणाले. "जे वंश, राष्ट्रीय किंवा वांशिक मूळ, भाषा, रंग, धर्म, वय, लिंग, लिंग ओळख, लिंग अभिव्यक्ती आणि यासारख्या आधारावर इतरांचे नुकसान करतात त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल," असे ते म्हणाले. "
'30 वर्षांहून अधिक काळापासून मूर्ती'
मंदिराचे अध्यक्ष डॉ. बुधेंद्र दुबे यांनी सांगितले की, ही मूर्ती सध्याच्या शांती पार्कमध्ये 30 वर्षांहून अधिक काळापासून आहे. त्याचे कधीही कोणत्याही प्रकारे नुकसान झाले नाही. मात्र आता या मुर्तीची विटंबना झाल्याचे बुधवारी पहाटे लक्षात आले. दुबे म्हणाले, "आम्ही इथे रिचमंड हिलमध्ये इतकी वर्षे शांततेत राहिलो. पण असे काहीही घडले नाही. आम्हाला आशा आहे की, या गोष्टी भविष्यात होणार नाहीत. "मात्र गांधीजींनी शिकवलेल्या मार्गाने जर आपण जगू शकलो तर आपण कोणाला किंवा कोणत्याही समाजाला दुखावणार नाही," असे ते म्हणाले.
भारतीय वाणिज्य दूतावास आणि भारतीय उच्चायुक्तालयाकडून निषेध
टोरंटोमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास आणि ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी या घटनेचा निषेध केला. दोघांनीही या गुन्ह्याबाबत कॅनडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे सांगितले. वाणिज्य दूतावासाने याला "गुन्हेगारी, घृणास्पद कृत्य" म्हटले आहे. या गुन्ह्यामुळे भारतीय समुदायात चिंता आणि असुरक्षितता निर्माण झाली आहे, असे उच्चायुक्तांनी म्हटले आहे.