एक्स्प्लोर
थायलंडमधील मुलांच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'मध्ये 'किर्लोस्कर'चं मोठं योगदान
भारत सरकार आणि केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख आणि मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली.
बँकॉक : थायलंडमधील गुहेमध्ये 24 जूनपासून अडकलेले 12 फुटबॉल खेळाडू आणि त्यांच्या कोचला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. या बचावकार्यात भारत सरकारनेही मोलाचं सहकार्य केलं. यासाठी महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनीचे फ्लड पंप्स पाठवण्यात आले.
किर्लोस्करचे इंजिनिअर असलेले सांगलीतील मिरजचे प्रसाद कुलकर्णी हेदेखील आपल्या टीमसह थायलंडला बचावकार्यासाठी गेले होते.अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी गुहेतील पाण्याची पातळी कमी करणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे थायलंड सरकारने भारत सरकारला किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लड पंप्स पाठवण्याची विनंती केली.
भारत सरकार आणि केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख आणि मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहचताच या टीमने कामास सुरुवात केली आणि फ्लड पंप्स सुरु केले. पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली.
थायलंडमधील या बचावकार्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह जगभरातील अनेक देशांची मदत घेण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या बचावकार्यानंतर आता या अडकलेल्या 12 मुलांसह त्यांच्या कोचला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
थायलंडमधील भारतीय दुतावासाने 2 जुलै रोजी या मुलांच्या मदतीसाठी आपले तंत्रज्ञ तयार आहेत, असं थायलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला कळवलं होतं. भारताचे थायलंडमधील राजदूत भगवंतसिंह बिश्नोई यांनी प्रकरणात विशेष लक्ष घालून मदतीची तयारी दर्शवली.
‘थँक्यू अॅम्बेसेडर बिश्नोई, थँक्यू इंडिया’ असं म्हणत थायलंडचे भारतातील राजदूत गोंगस्काडी यांनी ट्विटरवरुन भारताचे आभार मानले.
किर्लोस्कर ब्रदर्सची शाखा बँकॉकमध्येही कार्यरत असून थायलंडच्या सरकारबरोबर आजवर अनेकदा कंपनीने काम केलं आहे. ख्लाँग बँग सू ड्रेनेज प्रोजेक्ट तसेच बुंग बोराफेट येथे जलसंपादन विभागाबरोबर या कंपनीने काम केलं आहे. तसंच 2011 साली बँकॉक येथे आलेल्या पुराच्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी कंपनीने पंप दिले होते.
मुलं गुहेत कशी अडकली?
थायलंडमधील एका शाळेतील 12 मुलं फुटबॉल खेळल्यानंतर आपल्या कोचबरोबर 23 जूनला ‘टॅम लूंग’ ही गुहा पाहण्यासाठी गेली. पण गुहेत पुराचं पाणी आल्याने ही सर्व मुलं तिथंच अडकून पडली. त्यानंतर नॅशनल पार्कच्या कर्मचाऱ्यांना गुहेबाहेर सायकल आणि खेळाचं काही साहित्य दिसलं. याबाबत कर्मचाऱ्यांनी स्थानिक फुटबॉल क्लबशी संपर्क साधल्यानंतर 12 शालेय मुलं आणि त्यांचे कोच गुहेत अडकल्याचं समोर आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement