Khosta-2 Virus : कोरोनानंतर नव्या व्हायरसनं जगाची धाकधूक वाढवली, ना लस प्रभावी, ना औषधं; कसा पसरतो 'खोस्ता-2'?
Khosta-2 Virus : कोरोनापाठोपाठ नव्या व्हायरसनं जगाची चिंता वाढवली. कसा पसरतो हा व्हायरस, बचाव करण्यासाठी काय करावं? जाणून घ्या सविस्तर...
Khosta-2 Virus : गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळापासून जगाला कोरोना व्हायरसनं विळखा घातला आहे. कोरोनामुळं अनेकांनी आपले जीव गमावले. सध्या कोरोना प्रादुर्भावात (Coronavirus) घट झाली असली तरी धोका मात्र अद्याप टळलेला नाही. कोरोनाचा (Covid-19) उद्रेक 2019 मध्ये चीनमध्ये झाला आणि 2020 च्या सुरुवातीच्या महिन्यापर्यंत संपूर्ण जगाचा ताबा घेतला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, 2020 मध्ये संपूर्ण जग लॉकडाऊनच्या दिशेनं गेलं.
अडीच वर्षांहून अधिक काळापासून जगभरात कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. सर्व प्रकारच्या लसी आणि प्रतिबंधात्मक उपाय करूनही, आजपर्यंत तज्ज्ञ या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत की, ही महामारी कधी संपेल? कोविड-19 चा धोका अद्याप टळलेला नाही. अशातच एका अहवालात संशोधकांनी कोरोनासारख्या आणखी एका घातक व्हायरसबाबत इशारा दिला आहे. संशोधकांना रशियन वटवाघळांमध्ये खोस्ता-2 नावाचा नवा विषाणू आढळून आला आहे. जो SARS-CoV-2 व्हायरससारखाच आहे. प्राथमिक संशोधनाच्या आधारे, शास्त्रज्ञांना असं आढळलं की, हा व्हायरस मानवी पेशींमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतो आणि संसर्गाचा धोका वाढवू शकतो.
कोरोना काळातच शास्त्रज्ञांना आणखी एका विषाणूची माहिती मिळाली, जो कोरोनाप्रमाणेच वटवाघुळ, पॅंगोलिन, कुत्रे आणि डुक्कर या वन्य प्राण्यांमध्ये आढळतो. या व्हायरसचं नाव, खोस्ता-2. कोरोनावरील संशोधनादरम्यान, याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली होती. परंतु त्यावेळी वैज्ञानिकांनी या विषाणूला गांभीर्यानं घेतलं नाही, कारण त्यात अशी कोणतीही लक्षणं आढळून आलेली नव्हती. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष दिलं गेलं नाही.
पण नुकत्याच रशियात खोस्ता-2 व्हायरससंदर्भात एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कारण या संशोधनात हे स्पष्ट झालं आहे की, खोस्ता-2 व्हायरस मानवांनाही संक्रमित करू शकतो. त्यासोबतच हेदेखील स्पष्ट झालं आहे की, या विषाणूला रोखण्यासाठी कोरोनाची कोणतीही लस प्रभावी नाही. दरम्यान, खोस्ता-2 आणि कोरोना व्हायरस हे एकाच वर्गातील विषाणू आहेत. कोरोनाप्रमाणेच खोस्ताही शरीरातील पेशींवर हल्ला करतो. तसेच, सध्या कोरोना प्रतिबंधक लस म्हणून दिल्या जाणाऱ्या लसी खोस्ता व्हायरच्या संसर्ग क्षमतेवर आणि प्राणघातक हल्ल्यावर प्रभावी नसल्याचंही संशोधनातून समोर आलं आहे.
खोस्ता-2 व्हायरस संदर्भातील संशोधन रशियामध्ये करण्यात आलं असून क्लोज पॅथोजेन्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. या संशोधनातून समोर आलं आहे की, ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यांच्या शरीरासाठीही हा नवा व्हायरस तितकाच घातक आहे, जितका लस न घेतलेल्या व्यक्तिंसाठी आहे. दरम्यान, आतापर्यंत SARS कोविड-2 वर्गातील सर्व विषाणूंची नोंद झाली आहे. उदा. डेल्टा, ओमायक्रॉन. कोरोना लस या सर्व प्रकारांवर प्रभावी ठरली. परंतु, नव्यानं समोर आलेल्या खोस्ता-2 विषाणू कोरोनाच्याच वर्गातील असूनही ही लस प्रभावी ठरत नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
कसा पसरतो 'खोस्ता-2'?
खोस्ता-2 व्हायरस सध्या वटवाघुळ, पॅंगोलिन, रॅकून आणि कुत्रे यांसारख्या वन्य प्राण्यांमध्ये पसरत आहे. खोस्टा-2 व्हायरसची लागण मानवाला झाल्याचं एकही प्रकरण आतापर्यंत नोंदवण्यात आलेलं नाही. पण या संशोधनाशी संबंधित मायकेल लेटको म्हणतात की, "हा व्हायरस भविष्यात कोरोनासारखंच महामारीचं रूप धारण करू शकतो. विशेषत: कोविड विषाणूसह तो मानवांपर्यंत पोहोचला तर मात्र हा व्हायरस प्राणघातक ठरू शकतो."
नव्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काय कराल?
खोस्ता-2 व्हायरसपासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आधीच लस तयार करण्यास सुरुवात केली आहे. लस विकसित करण्याऐवजी केवळ खोस्ता-2 वर लक्ष केंद्रित करून आता वैज्ञानिक अशी लस तयार करत आहेत, जी SARS-CoV-2 वर्गातील (SARS-CoV-2) आणि यांसारख्या सर्व व्हायरसपासून मानवाचं संरक्षण करण्यासाठी प्रभावी ठरु शकेल.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )