(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना संकटात भारताने जशी मदत केली तशीच आम्ही देखील करण्यास कटिबद्ध, अमेरिकन अध्यक्षांची ग्वाही
भारताचे NSA अजित डोवाल आणि अमेरिकेचे NSA जेक सुलिवन यांच्यातील चर्चा यशस्वी ठरताना दिसत आहे. कोरोना लस बनवण्यासाठी कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदीची भूमिका अमेरिकेने मागे घेतली आहे. कोरोना संकटात ज्याप्रकारे भारताने केली तशीच मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी दिलं.
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका हे दोन असे देश आहेत, ज्यात कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक झाला आहे. परंतु कोरोना लस बनवण्यासाठी आवश्यक कच्च्या मालाच्या निर्यातीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी बंदी घालून भारताला मोठा झटका दिला. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या या निर्णयावर टीकाही झाली. पण भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या चर्चेनंतर यावर तोडगा निघताना दिसत आहे. अमेरिकेने आता बंदीची भूमिका मागे घेऊन हरप्रकारचं सहकार्य करण्याचं म्हटलं आहे.
या सकारात्मक बदलादरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. ज्यात त्यांनी कोरोना संकटात भारताला मदतीचा हात देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी ट्वीट केलं आहे की, "महामारीच्या सुरुवातीला जेव्हा आमच्या रुग्णालयांवर मोठा दबाव होता, त्यावेळी भारताने अमेरिकेला ज्या प्रकारची मदत केली होती, त्याच प्रकारे भारताला संकटसमयी मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
Just as India sent assistance to the United States as our hospitals were strained early in the pandemic, we are determined to help India in its time of need. https://t.co/SzWRj0eP3y
— President Biden (@POTUS) April 25, 2021
ज्यो बायडन यांनी हे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या ट्वीटला कोट करुन दिलं आहे, ज्यात त्यांनी संकटसमयी भारतीयांसोबत उभं राहण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. अमेरिका भारताला हरतऱ्हेची मदत करण्यासाठी तयार आहे. अमेरिका भारताला लस बनवण्यासाठी आवश्यक त्या कच्च्या मालाचा पुरवठा करेल. फ्रॅण्ट लाईन कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी अमेरिकेकडून तातडीने रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किट, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट दिले जातील.
याच मुद्द्यावर अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचंही वक्तव्य समोर आलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, अमेरिकन सरकार कोविड-19 च्या संकटात भारताला अतिरिक्त पाठिंबा आणि पुरवठा देण्यासाठी काम करत आहे. आम्ही भारताच्या नागरिकांसाठी, विशेषत: साहसी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रार्थना करतो.
The U.S. is working closely with the Indian government to rapidly deploy additional support and supplies during an alarming COVID-19 outbreak. As we provide assistance, we pray for the people of India—including its courageous healthcare workers.
— Vice President Kamala Harris (@VP) April 25, 2021
अमेरिकेच्या अध्यक्षांकडून मिळालेल्या या पाठिंब्यानंतर भारतात लस बनवण्याच्या कामाला वेग येणार आहे. तसंच देशव्यापी लसीकरण अभियानाला आणखी बळ मिळेल. सध्या अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. तसंच देशात कोरोनाबाधितांची संख्याही वाढतीच आहे. अशात लस हा एकमेव पर्याय आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतात लसीच्या उत्पादनाला आणि लसीकरण अभियानाला गती मिळणार आहे.