Israel Iran War : इराण खरोखरच अणवस्त्र बनवतंय? इस्त्रायलचा दावा किती खरा? नेत्यानाहूंचे राजकारण काय?
Israel Iran War : इराण आणि इस्रायलमधील वाद शिगेला पोहोचला असून मागील दोन दिवसांत इराणमध्ये 138 आणि इस्रायलमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याचा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा दावा आहे.

Israel Iran War Update : इराण अण्वस्त्रसज्ज होण्याच्या उंबरठ्यावर असल्यानेच इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मारा केला असा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी केला. जवळपास 10 अणुबॉम्ब बनवण्याची इराणची क्षमता असल्याचा दावा नेत्यानाहू करत आहेत. तसे पुरावेही अमेरिकेला सादर करणार असल्याचं इस्रायलने नुकतंच जाहीर केलं होतं. मात्र इस्रायलचा हा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय अणुशक्ती संस्था यांच्या माहितीही सुसंगत नाही. आयएईएच्या 22 पानांच्या अहवालात इराणने 2015 च्या अणुकराराचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. पण इराण अण्वस्त्र बनवण्याच्या उंबरठ्यावर आहे असा स्पष्ट निष्कर्ष नाही.
Israel Iran War : इराणची महत्त्वाकांक्षा, इस्रायलला धोका?
- इराणने 60 टक्के शुद्धतेचं 400 किलो युरेनियम संवर्धित केलं आहे.
- 10 अणुबॉम्ब तयार करण्यासाठी ही सज्जता पुरेशी आहे.
- हे युरेनियम 90 टक्के शुद्धतेपर्यंत वाढवलं तरीही अणुबॉम्बसाठीची तांत्रिक क्षमता त्यांच्याकडे नाही असं तज्ज्ञ सांगतात.
- IAEA ला इराणच्या काही अघोषित ठिकाणी मानवनिर्मित युरेनियमचे कण सापडले.
- 2003 मध्ये बंद झालेल्या इराणच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित हे युरेनियम असल्याचा दावा करण्यात आला.
- शांततापूर्ण कामासाठी हे युरेनियम वापरल्याचं इराणने म्हटलंय.
Israel Attack On Iran : नेत्यानाहू यांचा दावा राजकीय हेतूने प्रेरित
मात्र इराणवरील हल्ला केल्यानंतर नेत्यानाहू यांचा दावा हा राजकीय हेतूने प्रेरित असू शकतो. अमेरिका-इराण अणुकरार चर्चेला खीळ घालणं तसंच इस्रायलमधील अंतर्गत राजकारणापासून लक्ष्य वळवण्यासाठीही हे हल्ले केले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
इराणने युरेनियम संवर्धनात मोठी प्रगती केली आहे. पण ते अण्वस्त्र बनवण्याच्या जवळ आहे याबाबत ठोस पुरावे नाहीत. इराण 10 अणुबॉम्ब तयार करत आहे हा इस्रायलचा दावा अतिशयोक्तीपूर्ण असू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आता आयएईए आणि अमेरिकन गुप्तचरांचे अहवाल इस्रायलचे दावे आंतरराष्ट्रीय पातळीवर फोल ठरवणार का? असा प्रश्न आहे. इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेलं हे युद्ध तातडीने थांबणं हे जगाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
Donald Trump On Israel Iran War : इराण-इस्त्रायलमध्ये करार करणार, ट्रम्प यांचा दावा
इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पश्चिम आशियातील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. आधी इस्त्रायलने इराणवर हल्ला करत त्याचे नऊ अणुप्रकल्पांना लक्ष्य केलं. त्यामध्ये इराणचे 9 अणुशास्त्रज्ञ मारले गेले. त्यानंतर इराणनेही इस्त्रायलवर ड्रोन हल्ले सुरू केले. दरम्यान, या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने शांती घडवून आणली, करार घडवला तसाच करार इस्त्रायल आणि इराणमध्ये घडवणार असल्याचं ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं की, इराण आणि इस्रायलने शांती करार करावा. हे दोन्ही देश तसे पाऊल उचलतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेले युद्ध जसे थांबवले तसेच इराण आणि इस्त्रायल दरम्यानचे युद्धही थांबवणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
























