Mahsa Amini चं वास्तव जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक; अन्यायाला वाचा फोडण्याची भोगतेय मोठी किंमत
Iran Mahsa Amini Death : महसा अमिनीच्या मृत्यूची बातमी समोर आणणाऱ्या पत्रकाराला सध्या मोठी किंमत चुकवावी लागतेय. इराणमधील हिजाबविरोधी चळवळीचं वार्तांकन करणारी महिला पत्रकार सध्या अटकेत आहे.
Iranian journalist in Jail : इराणमधील (Iran) हिजाबविरोधी चळवळीचं वार्तांकन करणारी महिला पत्रकार सध्या अटकेत आहे. इराणमधील महिला अधिकार विषयक पत्रकार निलोफर हमिदी यांनी (Niloofar Hamedi) महसा अमिनी या (Mahsa Amini) तरुणीची बातमी सर्वात पहिल्यांदा जनतेसमोर आणली. महसा अमिनी या इराणी तरुणीचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. हिजाब परिधान केला नसल्यामुळे या तरुणीला अटक करण्यात आली होती. इराणी पत्रकार निलोफर हमिदी यांनी महसाची बातमी जगासमोर आणली. यामुळे इराणमधील परिस्थितीचं वास्तव जगासमोर आलं. पण याची मोठी किंमत निलोफर यांना फेडावी लागतं आहे.
पत्रकार निलोफर हमिदी यांना अटक
पोलिसांच्या अटकेत असलेल्या महसा अमिनीचा (Mahsa Amini Death) मृत्यू झाला. तीन दिवस पोलीस कोठडीत असलेल्या महसा अमिनीला गंभीर जखमी अवस्थेत तेहरान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी महसाचे आईवडील आणि भाऊ एकमेकांना बिलगुन रडत असतानाचा फोटो पत्रकार निलोफर यांनी काढला. हा फोटोनंतर जगासमोर आला. उपचारादरम्यान महसा अमिनी या 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे महसाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. इथूनच पुढे इराणमधील हिजाब विरोधी चळवळीला सुरुवात झाली. पण या अन्यायाविरोधात लढणाऱ्या आणि वाचा फोडणाऱ्या पत्रकार निलोफर हमिदी यांना हे प्रकरण महागात पडलं.
महसा अमिनीचं प्रकरण जगासमोर आणल्याची किंमत?
16 सप्टेंबर रोजी निलोफर हमिदी यांनी महसाच्या कुटुंबियांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. यामुळेच इराणमधील धक्कादायक वास्तव जगासमोर आलं. पण यानंतर काही दिवसांनी पत्रकार निलोफर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली. 22 सप्टेंबर रोजी निलोफर यांचे वकील (Niloofar Hamedi's lawyer) मोहम्मद अली कामफिरोझी (Mohammad Ali Kamfirouzi) यांनी माहिती दिली की, 'सुरक्षा यंत्रणांनी पत्रकार निलोफर हमिदी यांच्या घरावर छापेमारी केली. त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर काही सामान जप्त करण्यात आलं.'
सुमारे 28 पत्रकार अटकेत
इराणमधील हिजाब विरोधी चळवळीचं वार्तांकन करणाऱ्या अनेक पत्रकारांना ताब्यात घेण्यात आलं. इराण सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. हिजाब विरोधी चळवळीचं वार्तांकन करणारे सुमारे 28 पत्रकार सध्या अटकेत आहेत. निलोफर हमिदी यांच्याप्रमाणे इतरही पत्रकारांना त्यांची काहीही चूक नसताना आणि त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध होत नसतानाही अटकेत आहेत अशी माहिती, पत्रकार निलोफर यांच्या वकिलांनी दिली आहे.
हिजाबविरोधी निदर्शनं तीव्र
महसा अमिनीच्या मृत्यूनंतर जनतेमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळाला. महिलांनी ठिकठिकाणी हिजाबविरोधी आंदोलनं करण्यास सुरुवात केली. महिलांनी केस कापत आणि हिजाब जाळत सरकारचा निषेध केला. सध्या हे लोण संपूर्ण इराणमध्ये पोहोचलं आहे. महसा अमिनी नंतरही हिजाब विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. गंभीर जखमा असलेले तरुणींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळलं. इराणमध्ये ठिकठिकाणी हिजाब विरोधात आंदोलनं सुरु आहेत.