Iran US Conflict : होर्मुझला अमेरिकेचा वेढा, आततायी डोनाल्ड ट्रम्प सगळ्या जगाची कोंडी करणार? आखातात युद्धाची धास्ती वाढली
Hormuz Strait Crisis : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं होर्मुझ सामुद्रधुनीवर वेढा घातल्याने आखातात तणाव वाढला असून चीननंही अमेरिकेला थेट इशारा दिला आहे.

मुंबई : इराण-अमेरिकेतली इस्लामाबाद चर्चा फिस्कटल्यानंतर दोन दिवसांनी महत्त्वाची घटना घडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार होर्मुझ सामुद्रधुनीवर वेढा घालण्यात आला आहे.त्यामुळे अद्याप मोठा संघर्ष उडाला नसला, तरी पुन्हा युद्ध भडकण्याची धास्ती वाढली आहे. त्यातच आता चीननंही अमेरिकेला इशारा दिल्यामुळे आखातातला तणाव वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
Hormuz Blockade : अमेरिकेची आक्रमक कारवाई
अमेरिकेच्या सेंटकॉमने(CENTCOM) आधी होर्मुझमधून कोणतेही जहाज जाऊ दिले जाणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र नंतर इराणच्या बंदरांकडे जाणारी किंवा तेथून निघणारी जहाजे अडवली जातील, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच इराणी रिव्होल्युशनरी गार्डला 20 लाख डॉलरचा ल देऊन जाणाऱ्या जहाजांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे.
Strategic Ports : इराणची महत्त्वाची बंदरे लक्ष्यावर
इराणचं चाबहार बंदर हे होर्मुजच्या सामुद्रधुनीचं प्रवेशद्वार मानलं जातं. ओमानच्या आखातातून भारत आणि मध्य आशियातील व्यापारासाठी हे बंदर अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याखालोखाल बंदर अब्बास हीदेखील होर्मुझ मार्गावरील इराणची मुख्य चौकी आहे. याच बंदरातून होर्मुझमधल्या जहाजांच्या हालचालींवर नियंत्रण केलं जातं. याखेरीज पर्शियाच्या आखातात असलेली खुमेनी, बुशहर, महशहर ही बंदरं तसंच किश आणि लावन ही पर्शियाच्या आखातातील इराणची बेटं व्यापारी दृष्टीनं महत्त्वाची आहेत.
Iran Warning : इराणचा प्रत्युत्तराचा इशारा
अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या बंदरांना धोका निर्माण झाल्यास पर्शियन आखात आणि ओमान आखातातील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेच्या नौदलानं आक्रमक कारवाई केली, तर आखातातील सर्वाच्या सर्व बंदरं उडवून देण्याची धमकी इराणनं दिली.
China Vs US : चीनची थेट धमकी
इराणच्या इशाऱ्यानंतरही होर्मुझला वेढा देऊन ट्रम्प यांनी या एका दगडात चार पक्षी मारल्याचं मानलं जातंय. युद्धानं आधीच जर्जर झालेल्या इराणचा सागरी तेल व्यापार ठप्प झाला, तर मोठी आर्थिक कोंडी होईल. होर्मुझ खुलं ठेवण्यासाठी ट्रम्प मदत मागत असलेल्या मित्रराष्ट्रांवर आता अमेरिकेचीच मनधरणी करण्याची वेळ येऊ शकते. यातून शस्त्रसंधीला तयार व्हावं, यासाठी इराणवर आंतरराष्ट्रीय दबाव आणखी वाढेल, अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे.
ट्रम्प यांचं सर्वात महत्त्वाचं टार्गेट आहे चीन. चीन हा इराणकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा देश आहे. या ब्लॉकेडमध्ये चीनचा पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात आल्यामुळेच चीननं प्रथमच अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. आमची जहाजं आणि टँकर होर्मुझमधून येत जात राहतील. इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार आहे. होर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका, अशा शब्दांत चीननं अमेरिकेला इशारा दिला आहे.
असं असतानाही वेढा सुरू झाल्यानंतर चीनचं 'रिच स्टेरी' हे जहाज अमेरिकेच्या नौदलानं अडवलं होतं. तब्बल सहा तास पर्शियाच्या आखातात अडकून पडल्यानंतर या जहाजानं इराणनं मान्य केलेल्या मार्गावरून होर्मुझ पार केलं.
अमेरिकेचा वेढा तोडून होर्मुझ पार करणारं हे पहिलंच जहाज ठरलंय. दुसरीकडे ट्रम्प यांनी केलेला हा 'ब्लॉकेड' आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन करणारा असून, त्याविरोधात दाद मागितली जाऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
Global Impact : तेल बाजारावर परिणाम
या घडामोडींनंतरही अद्याप मोठा संघर्ष झालेला नाही. काही जहाजांची हालचाल सुरू असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये थोडी घट दिसून आली आहे. मात्र तणाव कायम असल्याने परिस्थिती कोणत्याही क्षणी चिघळू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार





















