India China : चीनची आणखी एक आगळीक? गलवान खोऱ्यामध्ये चिनी झेंडा फडकवल्याचा दावा
Galwan Valley : भारत-चीनमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनने गलवान खोऱ्यात राष्ट्रध्वज फडकवल्याचा दावा केला आहे.
China host flag in Galwan Valley : आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनची आगळीक सुरू आहे. जवळपास दीड वर्षापूर्वी भारत-चीन सैन्यादरम्यान संघर्ष झालेल्या गलवान खोऱ्यात चीनने त्यांचा राष्ट्रध्वज फडकवल्याचा दावा केला आहे. चिनी माध्यमांनी आणि पत्रकारांकडून हा दावा करण्यात येत आहे. मागील वर्षी लडाख पूर्वमध्ये चीनने आगळीक करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तणाव निर्माण केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणाव सुरूच आहे.
चीनने नवीन वर्षाच्या निमित्ताने गलवान खोऱ्यात राष्ट्रध्वज फडकवल्याचा दावा केला आहे. ट्वीटरवर चीनच्या माध्यमांनी, पत्रकारांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत चिनी सैन्याने गलवान खोऱ्यात चीनचा राष्ट्रध्वज फडकवत राष्ट्रगीत म्हटले असल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्रकार शॅन शिवेई यांनी ट्वीट करून म्हटले की, नवीन वर्षात गलवान खोऱ्यात चिनी ध्वज फडकला आहे. तिएनमान चौकानंतर गलवानमध्ये चिनी राष्ट्रध्वज फडकवला जाणे विशेष बाब असल्याचे म्हटले.
चीनचा प्रपोगंडा?
चीनकडून ट्वीट करण्यात आलेल्या ट्वीटवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. चीनने याआधीदेखील काही व्हिडिओ प्रपोगंडासाठी वापरले होते. काही महिन्यानंतर हे व्हिडिओ दिशाभूल करणारे असल्याचे समोर आले होते.
भारताकडून अद्याप प्रतिक्रिया नाही
चीनच्या या व्हिडिओवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तर, चीनने ट्वीट केलेल्या व्हिडिओवर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या आगळकीवर मौन सोडण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, गलवानवर आपला तिरंगाच चांगला वाटतो, चीनला उत्तर द्यावं लागेल, मोदीजी मौन सोडा, असे ट्वीट केले आहे.
गलवान खोऱ्यातील संघर्ष
15 आणि 16 जून 2020 च्या मध्यरात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. या संघर्षात भारताचे 21 जवान शहीद झाले होते. चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आगळीक करत भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमधील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दोन्ही देशांनी लडाखमधील काही भागांमधून सैन्य माघारी घेण्यावर एकमताने निर्णय घेतला. मात्र, अद्यापही समाधानकारक तोडगा निघाला नाही.