Ukraine-Russia conflicts : भारतीयांनो, युक्रेन देश त्वरित सोडा.. दुतावासांची अॅडव्हायझरी वाचलीत?
रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने (indian Embassy) भारतीय नागरिकांसाठी एक अॅडव्हायझरी (advisory for indians) जारी केली आहे
Ukraine-Russia conflicts : रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने (indian Embassy) भारतीय नागरिकांसाठी एक अॅडव्हायझरी (advisory for indians) जारी केली आहे. दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना, विशेषत: विद्यार्थ्यांना तात्पुरता देश सोडण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये सध्या 20 हजारांहून अधिक भारतीय आहेत.
भारतीयांनो.. युक्रेनमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला
दूतावासाने सांगितले की, जर गरज नसेल तर विद्यार्थ्यांना येथे राहण्याची गरज नाही, त्यांनी त्वरित युक्रेन (ukraine) सोडावे. भारतीयांना (indians) युक्रेनमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दूतावासाने भारतीय नागरिकांना असे सांगितले की, युक्रेनमधील राहत असल्यास त्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती द्या, जेणेकरुन आवश्यक असल्यास दूतावास त्यांच्याशी संपर्क साधू शकतील.
रशिया-युक्रेन सीमेवर सैन्य वाढवल्याचा आरोप
26 जानेवारीला युक्रेनमधील भारतीय दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना लवकरात लवकर नोंदणी करण्यास सांगितले होते. दूतावासाने म्हटले होते की, जे विद्यार्थी भारतातून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत, त्यांनी फॉर्म भरू नये. कारण गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनमधील तणाव वाढला आहे. रशिया आणि नाटो एकमेकांवर रशिया-युक्रेन सीमेवर सैन्य वाढवल्याचा आरोप करत आहेत. रशियाने हल्ल्याची तयारी केल्याचा आरोप अमेरिका आणि युक्रेनने केला आहे. दरम्यान, मॉस्कोने हा आरोप खोटा ठरवून हल्ला करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने यापूर्वी सांगितले होते की, युक्रेन आणि रशियामधील तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतल्यास भारत त्याचे स्वागतच करेल.
रशियाने यापूर्वीच काळ्या समुद्रात अनेक पाणबुड्या तैनात केल्या
युक्रेनच्या सीमेजवळ रशियन सैनिक सतत पहारा देत असल्याच्याही बातम्या येत आहेत. त्याचबरोबर हळूहळू अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणे याठिकाणी जमा होत आहेत. हॉवित्झर, टाक्या, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे आणि इतर अनेक प्राणघातक शस्त्रे यांचा समावेश करण्यात येत आहे. युक्रेन सीमेजवळ 100,000 हून अधिक रशियन सैनिकांचा मेळावा असल्याचा दावा अमेरिकन अधिकारी आधीच करत आहेत. अशातच काळ्या समुद्रात रशियाने यापूर्वीच अनेक पाणबुड्या तैनात केल्या आहेत. मैदानी भागातही आधुनिक शस्त्रास्त्रांसह सैनिकांची संख्याही वाढवली जात आहे.
बीजिंग ऑलिम्पिक संपण्यापूर्वी रशिया युक्रेनवर करणार हल्ला?
बीजिंग ऑलिम्पिक संपण्यापूर्वी रशिया युक्रेनवर हल्ला करू शकतो, असा दावाही अमेरिकेने केला होता. अशा परिस्थितीत अमेरिकेने पुन्हा आपल्या नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. इतर अनेक देशही लोकांना तेथे जाण्यास नकार देत आहेत आणि तेथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांना तेथून जाण्याचे आवाहन करत आहेत.