(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Iran-Saudi : तिसऱ्या महायुद्धाची चाहूल! इराण सौदी अरेबियावर हल्ला करणार? अमेरिकेचे सैन्य हाय अलर्टवर
Iran May Attack On Saudi : गुप्तचर माहितीच्या आधारावर सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स आणि इतर शेजारी देशांनी त्यांच्या सैन्य दलांसाठी सतर्कता वाढवली आहे.
Iran May Attack On Saudi : इराण सौदी अरेबियावर हल्ला करू शकतो, सौदी अरेबियाने (Saudi Arabia) अमेरिकेला (America) गुप्त माहितीच्या आधारे कळविले आहे. ही माहिती समोर येताच आखाती देशांमधील अमेरिकी लष्कराला हाय-अलर्टवर ठेवण्यात आले आहे. सौदी आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारावर सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स आणि इतर शेजारी देशांनी त्यांच्या सैन्य दलांसाठी सतर्कता वाढवली आहे.
अमेरिकी लष्कर हाय-अलर्टवर
सौदी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, इराणमध्ये सप्टेंबरपासून निदर्शने सुरू आहेत. देशांतर्गत कलहावरून सौदी अरेबिया इराकवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सांगितले की, ते या हल्ल्याच्या इशाऱ्यांबद्दल चिंतित आहेत, तसेच इराणने हल्ला केल्यास त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्याने सांगितले की,"आम्ही या धोक्याबद्दल चिंतित आहोत." आम्ही गुप्तचर माध्यमांद्वारे सौदीच्या सतत संपर्कात आहोत.
सप्टेंबरमध्ये इराणचा इराकवर हल्ला
सप्टेंबरच्या महिन्याच्या शेवटी, इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि सशस्त्र ड्रोनसह उत्तर इराकवर हल्ला केला. तसेच अमेरिकन लष्करी तळ असलेल्या एरबिल शहराकडे जात असताना अमेरिकेच्या युद्धविमानाने ड्रोन पाडले. इराणच्या अधिकार्यांनी सौदी अरेबियावर अमेरिका आणि इस्रायलसह देशात निदर्शने भडकवल्याचा जाहीर आरोप केला. गेल्या महिन्यात, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कमांडरने सौदी अरेबियाला निषेधाचे टीव्ही कव्हरेज रोखण्याचा इशाराही दिला होता.
अनेक ठिकाणी हल्ल्यांची योजना
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिका आणि सौदी अरेबिया हाय अलर्टवर आहेत, कारण सौदीच्या गुप्तचरांनी अमेरिकेला माहिती दिली आहे की इराण सौदी अरेबियातील अनेक ठिकाणांवर हल्ला करण्याचा विचार करत आहे. दोन्ही देशांच्या अधिकार्यांनी या येऊ घातलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली.
हा आमचा शेवटचा इशारा - मेजर जनरल
इराणचे मेजर जनरल हुसैन सलामी म्हणाले होते, 'हा आमचा शेवटचा इशारा आहे, कारण तुम्ही या माध्यमांद्वारे आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहात.' इराणच्या सरकारी मीडिया IRNA च्या मते, इराण इंटरनॅशनल हे लंडनमध्ये सौदी अरेबियाने तयार केलेले नेटवर्क आहे. जे पूर्णपणे इराणच्या विरोधात काम करते. इराणमध्ये सध्या हिजाबशी संबंधित निदर्शने सुरू आहेत, ज्यामध्ये 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1000 जणांना अटक करण्यात आली आहे.