Assassinations That Shook The World : अब्राहम लिंकन, महात्मा गांधी ते शिंजो आबेंपर्यंत, जगाला हादरवून टाकणाऱ्या 10 धुरंदर नेत्यांच्या हत्या!
Assassinations That Shook The World : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची पश्चिमी शहरातील नारामध्ये संसदीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Assassinations That Shook The World : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची पश्चिमी शहरातील नारामध्ये संसदीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रचारसभेत बोलत असतानाच लष्करातून निवृत्त झालेल्या सैनिकाने 67 वर्षीय आबे यांच्यावर मागून गोळीबार केला, असे जपानी माध्यमांनी सांगितले.
या घटनेने देश आणि जगाला धक्का बसला आहे. कारण जपानमध्ये राजकीय हिंसाचार दुर्मिळ आहे आणि बंदुकांवर कडक नियंत्रण आहे. 1936 मधील युद्धपूर्व सैन्यवादाच्या दिवसांपासून एखाद्या आजी किंवा माजी जपानी पंतप्रधानाची हत्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, आबे यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यांना अपयश आले. गोळी झाडल्यानंतर सुमारे साडेपाच तास त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूला असलेल्या दोन खोल जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला, असे एका डॉक्टरने राष्ट्रीय टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्समध्ये सांगितले.
जग या भीषण घटनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असताना, जगभरातील 10 प्रमुख हत्यांवर एक नजर टाकूया
1. अब्राहम लिंकन (Abraham Lincoln)
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची 14 एप्रिल 1865 रोजी हत्या करण्यात आली. 1862 मध्ये, लिंकन यांनी गुलामगिरी संपुष्टात आणण्यासाठी मुक्तीची घोषणा जारी केली होती. त्यांचा मारेकरी, जॉन विल्क्स बूथ, जो गुलामगिरीचा प्रखर वकिल होता त्याने वॉशिंग्टन डीसीच्या फोर्ड थिएटरमध्ये कोणत्याही अंगरक्षकांशिवाय नाटक पाहत असताना अब्राहम लिंकन यांना गोळ्या घातल्या. बूथ पाठीमागून वर आला आणि पॉइंट-ब्लँक रेंजने त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. 26 एप्रिल 1865 रोजी बूथने आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्याने फेडरल सैन्याने गोळ्या घालून ठार केले.
2. मेरी-फ्राँकोइस सॅडी कार्नोट (Marie-François Sadi Carnot)
डिसेंबर 1887 ते 1894 पर्यंत देशाची सेवा करणारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मेरी-फ्राँकोइस सॅडी कार्नोट यांना 24 जून 1894 रोजी लियोन येथे भाषण देताना इटालियन अराजकतावादी सांते जेरोनिमो कॅसेरियोने यकृतामध्ये वार केले होते. जरी कार्नोट यांना अध्यक्षपद फ्रान्ससाठी अशांत काळात आले असले तरी, त्यांनी आपली लोकप्रियता कायम राखली. कार्नोट 25 जून 1894 रोजी मरण पावले आणि नंतर त्यांच्या मारेकऱ्याला शिक्षा म्हणून फाशी देण्यात आली.
3. महात्मा गांधी (Mahatma Gandhi)
जगातील सर्वात प्रसिद्ध नेत्यांपैकी एक, मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखले जाते. 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. गांधी यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते मानले जाते. त्यांच्या अहिंसावादी मुल्याचा जग आजही सन्मान करते. नवी दिल्ली येथे एका प्रार्थना समारंभात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्या छातीत 3 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेने फाळणी आणि त्यानंतर लोकांना भोगावे लागलेल्या त्रासासाठी गांधींना जबाबदार धरले. गोडसेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्याऐवजी गांधी उपोषणात व्यग्र होते.
4. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर (Martin Luther King Jr)
मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी 1950 च्या दशकात 1968 मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत यूएस मध्ये नागरी हक्क चळवळीचे नेतृत्व केले. यूएसएमध्ये आफ्रिकन-अमेरिकन लोकांचे कायदेशीर विलग्नता दूर करण्यासाठी चळवळीतील त्यांचे योगदान सर्वोत्कृष्ट होते. त्यांचा मारेकरी जेम्स अर्ल रे याने ते हाॅटेल रुमच्या बाल्कनीत उभा असताना त्यांना गोळ्या घालून हत्या केली. या हत्येमुळे राष्ट्रीय शोक काळ सुरू झाला ज्यामुळे समान गृहनिर्माण विधेयक मंजूर होण्यास मदत झाली. नागरी हक्क युगातील ही मोठी उपलब्धता मानली जाते.
5. अल्डो मोरो (Aldo Moro)
1963 ते 1968 पर्यंत इटलीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलेल्या अल्दो मोरो यांना 9 मे 1978 रोजी डाव्या विचारसरणीच्या कट्टर गटाने मारले होते. त्यांचे या गटाने अपहरण केले होते आणि त्यांच्या कैदेत असलेल्या साथीदारांच्या सुटकेची मागणी केली होती. इटालियन सरकारने त्यांना मुक्त करण्यास नकार दिला आणि अशा प्रकारे मोरो यांना 2 महिने ताब्यात ठेवले आणि नंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
6. जॉन एफ केनेडी (John F Kennedy)
जॉन एफ केनेडी हे युनायटेड स्टेट्समधील सर्वात जादुई व्यक्तीमत्वांपैकी एक मानले जातात. ते 1961 ते 1963 पर्यंत राष्ट्राध्यक्ष होते. 22 नोव्हेंबर 1963 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. केनेडी यांना ली हार्वे ओस्वाल्डने दोनदा गोळ्या घातल्या होत्या. त्यांचा वाहन ताफा 1963 मध्ये डॅलस, टेक्सासमधून जात असताना ही घटना घडली होती. मारेकरी ओस्वाल्डला दोन दिवसांनी नाईट क्लबच्या मालकानेही गोळ्या घालून ठार मारले. केनेडी यांच्या हत्येमागे एक मोठा कट असल्याचा अनेकांचा विश्वास होता, पण काहीही सिद्ध होऊ शकले नाही.
7. इंदिरा गांधी ( Indira Gandhi)
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी सकाळी त्यांच्याच दोन अंगरक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी गोळ्या झाडल्या. इंदिरा गांधी यांनी खलिस्तानची मागणी करणाऱ्या फुटीरतावाद्यांचा बिमोड करण्यासाठी पंजाबमध्ये लष्करी कारवाई केली होती. या कारवाईमुळे शीख समुदायात नाराजी पसरली आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येला बदला म्हणून पाहिले गेले.
8. राजीव गांधी (Rajiv Gandhi)
1984 ते 1989 या काळात देशाची सेवा करणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांची मे, 1991 मध्ये श्रीलंकेच्या फुटीर संघटनेची थेनमोझी राजरत्नमने हत्या केली होती. तिने स्वत:ला बॉम्ब बांधून आत्मघाती हल्ला केला. त्यात राजीव गांधी आणि इतर किमान 14 जण ठार झाले.
9. यित्झाक राबिन (Yitzhak Rabin)
4 नोव्हेंबर 1995 रोजी तेल अवीव येथील एका रॅलीत इगल अमीर या उजव्या विचारसरणीच्या अतिरेक्याने इस्रायली पंतप्रधान यित्झाक राबिन यांची गोळ्या झाडून हत्या केली. राबिन इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रांमध्ये शांतता करार झालेला नाही.
10. बेनझीर भुट्टो (Benazir Bhutto)
बेनझीर भुट्टो 1988 ते 1990 आणि पुन्हा 1993 ते 1996 पर्यंत पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या. डिसेंबर 2007 मध्ये रावळपिंडी येथे एका निवडणूक रॅलीत आत्मघाती बॉम्बस्फोटात मारल्या गेल्या. त्यांच्या हत्येमुळे त्यांच्या पक्षाला लोकप्रिय पाठिंबा मिळाला. पाकिस्तान पीपल्स पक्षाने दोन महिन्यांनंतर झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या.