(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mikhail Gorbachev: सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन, 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mikhail Gorbachev Passes away: शीतयुद्धाचा शेवट करणारे सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह (Mikhail Gorbachev) यांचे मंगळवारी (30 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले.
Mikhail Gorbachev Passes away: शीतयुद्धाचा (Cold War) शेवट करणारे सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह (Mikhail Gorbachev) यांचे मंगळवारी (30 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रशियन मीडिया रिपोर्टनुसार, मिखाईल गोर्बाचेव्ह हे मागील काही काळापासून आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
मिखाईल गोर्बाचेव्ह अनेक दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलचा हवाला देत मिखाईल सर्गेविच गोर्बाचेव्ह यांचे मंगळवारी संध्याकाळी गंभीर आणि दीर्घ आजाराने निधन झाले असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष
मिखाईल गोर्बाचेव्ह हे युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिकचे अर्थात यूएसएसआरचे शेवटचे नेते होते. त्यांना नेहमी लोकशाही तत्त्वांच्या आधारावर नागरिकांना स्वातंत्र्य देऊन कम्युनिस्ट राजवटीत सुधारणा करायची होती. 1989 मध्ये, जेव्हा कम्युनिस्ट पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनमध्ये लोकशाही समर्थक निदर्शने तीव्र झाली, तेव्हा गोर्बाचेव्ह (Mikhail Gorbachev) यांनी विचारपूर्वक बळाचा वापर करणे टाळले होते. त्यांनी ग्लासनोस्टचे धोरण अर्थात सरकारला सल्ला आणि माहितीच्या विस्तृत प्रसाराचे धोरण स्वीकारले होते. त्यांच्या आधीच्या राजवटीत भाषण स्वातंत्र्याला फारसे महत्त्व देण्यात आले नव्हते. गोर्बाचेव्ह यांनी पेरेस्ट्रोइका नावाच्या आर्थिक सुधारणांचा कार्यक्रमही सुरू केला होता. कारण त्याकाळात सोव्हिएत अर्थव्यवस्था महागाई आणि पुरवठा टंचाई या दोन्हींशी संघर्ष करत होती. त्यांच्या काळात प्रेस आणि कलात्मक समुदायाला सांस्कृतिक स्वातंत्र्य दिले गेले होते.
वयाच्या 54व्या वर्षी 1985 मध्ये सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस झाल्यावर, त्यांनी मर्यादित राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्ये आणून व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या या सुधारणा नियंत्रणाबाहेर गेल्या. अनेक रशियन लोकांनी गोर्बाचेव्ह यांना त्यांच्या सुधारणांमुळे निर्माण झालेल्या अशांततेसाठी कधीही माफ केले नाही.
नोबेल पुरस्काराने सन्मानित!
सरकारी यंत्रणेवरील पक्षाचे नियंत्रण कमी करण्यासाठी त्यांनी आमूलाग्र सुधारणा केल्या. उल्लेखनीय म्हणजे, त्यांच्या राजवटीत हजारो राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली. युनायटेड स्टेट्सबरोबरच्या आण्विक निःशस्त्रीकरण करारासाठी ते प्रसिद्ध आहेत. सोव्हिएत युनियनचे अध्यक्षपद सोडल्यानंतर गोर्बाचेव्ह (Mikhail Gorbachev) यांना जगभरातील अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांना 1990 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला होता. शीतयुद्धाचा शेवट करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. यासाठीच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
हेही वाचा :
US-China Dispute : अमेरिकेच्या दोन युद्धनौका तैवानमार्गे रवाना; चीननं घेतली धास्ती