HIV : स्टेम सेल प्रत्यारोपणानंतर महिला झाली एचआयव्हीमुक्त, अमेरिकन संशोधकांचं मोठं यश
First woman reported cured of HIV : एचआयव्ही या आजारावर अमेरिकन शास्त्रज्ञांना मोठं यश मिळालं आहे. अमेरिकेत एक महिला एचआयव्ही मुक्त झाली असून एचआयव्हीमुक्त झालेली जगातील ही पहिलीच महिला आहे
First woman reported cured of HIV : एचआयव्ही एड्स रूग्णांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. एचआयव्ही रूग्ण आता एड्समुक्त होऊ शकतो. संशोधनातून नुकतीच ही बाब समोर आली आहे. स्टेम सेल प्रत्यारोपणाद्वारे करण्यात आलेल्या उपचारानंतर अमेरिकेत एक महिला एचआयव्हीमुक्त झाली आहे. एचआयव्हीमुक्त झालेली ही जगातील पहिलीच महिला आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एचआयव्हीग्रस्त महिलेवर स्टेम सेल प्रत्यारोपणाद्वारे उपचार करण्यात आले. एचआयव्ही विषाणूंविरूद्ध नैसर्गिक प्रतिकार असलेल्या व्यक्तीने स्टेम पेशी दान केल्या होत्या. त्या पेशी या महिलेच्या शरीरात प्रत्यारोपण केल्या. त्यानंतर या महिलेची चाचणी करण्यात आली. ती चाचणी एचआव्ही निगेटिव्ह आली. उपचारानंतर गेल्या 14 महिन्यांपासून या महिलेची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, एचआयव्हीमुक्त होणारी ही जागातील पहिली महिला असून यापूर्वी दोन पुरूष एचआयव्हीमुक्त झाले आहेत.
2013 ला या महिलेला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर चार वर्षांनी तिला रक्ताचा कर्करोग झाला. रक्ताच्या कर्करोवर हॅप्लो-कॉर्ड प्रत्यारोपणाद्वारे उपचार केले जातात. त्यानुसार तिच्यावर उपचार करण्यात आले. या महिलेचे 2017 मध्ये शेवटचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 4 वर्षांत ती पूर्णपणे बरी झाली आहे. प्रत्यारोपणाच्या तीन वर्षानंतर, डॉक्टरांनी तिचे एचआयव्हीवरील उपचार देखील बंद केले आहेत.
कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस (UCLA) च्या डॉ. यव्होन ब्रायसन आणि बॉल्टिमोरमधील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या डॉ. डेबोराह परसॉड यांच्या नेतृत्वाखाली या आजारावर संशोधन करण्यात येत आहे. संशोधनासाठी 25 एचआयव्हीग्रस्तांवर उपचार करण्यात येत आहेत.
या रुग्णांना कर्करोगाच्या रोगप्रतिकारक पेशी नष्ट करण्यासाठी प्रथम केमोथेरपी केली जाते. त्यानंतर विशिष्ट अनुवांशिक व्यक्तींकडून स्टेम पेशींचे प्रत्यारोपण केले जाते. त्यानंतर या व्यक्ती एचआयव्हीला प्रतिरोधक प्रतिकारशक्ती विकसित करतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
एचआयव्ही हा आजार ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे होतो. एकदा हा आजार जडला की, तो व्यक्ती एड्समुक्त होत नाही. तसे संशोधनही अद्याप झालेले नव्हते. परंतु, आता अमेरिकन शास्त्रज्ञांना मिळालेल्या यशामुळे हा आजार असणाऱ्या रूग्णांना दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या