एक्स्प्लोर

BLOG | एड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर..

भारतातील कोविड विषाणूच्या साथीसंदर्भात डब्ल्यूएचओच्या विविध इशाऱ्यांनी एक प्रकारचा धुमाकूळ घातल्याचे दिसून येते, अजूनही याची मोठी दहशत आढळते. WHO ने याहून भयानक इशारे भारतातील एड्सच्या प्रादुर्भावासंदर्भात दिलेले होते. 2002 साली दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं होतं की, साल 2010 पर्यंत भारतातील एड्सबाधितांची संख्या अडीच कोटी इतकी असेल. प्रतिदिन तब्बल हजार लोकांना एड्सची बाधा होईल असंही म्हटलं होतं. भारत हा एड्स कॅपिटल बनून जाईल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र साल 2010 येऊन गेले, डब्ल्यूएचओने सांगितल्यासारखी भयानक स्थिती देशभरात झाली नाही. 

पोलिओ निर्मूलनासाठी भारताने राबवलेल्या धोरणांचा, आराखड्याचा नेहमीच जगभरात गौरव होत राहिला. मात्र एड्सच्या महाभयानक संसर्गजन्य एपिडेमिकवर भारताने मिळवलेल्या विजयावर अगदी किरकोळ  उल्लेख समोर आले. हा भेदभाव का झाला याचं उत्तर आपल्या मानसिकतेत आहे. खरं तर हा आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सर्वात मोठा विजय होता, कोविडच्या साथीवरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच की आपली सार्वजनिक व खाजगी आरोग्य व्यवस्था अगदीच बेताची आणि पुरती सक्षम नाही. मग दोन दशकापूर्वी जेव्हा एड्सच्या संसर्गाचे इशारे दिले जात होते तेव्हा तर अगदीच प्राथमिक अवस्थेत आपली आरोग्य व्यवस्था होती, असं असूनही आपण हे करू शकलो. हे सगळं कुणामुळे शक्य झालं त्यांना श्रेय नको का द्यायला? आपण यात कोतेपणा दाखवला मात्र जगभरातील काही एनजीओंनी यासाठी मुक्तकंठाने आपल्याकडील सेक्स वर्कर्सची तारीफ केली. या महिलांसोबतच आणखी एक नाव महत्वाचं होतं ते म्हणजे अशोक अलेक्झांडर!

अशोक अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांचे पुत्र. पीसींनी इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलं होतं. तर अशोक हे मॅकिनस्की अॅन्ड कंपनीमध्ये वरिष्ठ संचालक पदावर कार्यरत होते. एड्सच्या साथीचे इशारे जेव्हा जाहीर केले जाऊ लागले तेव्हा अनेकांच्या पोटात भीतीचे गोळे उठू लागले. अनेकांनी यासाठी काही तरी केलं पाहिजे यावर जोर दिला जाऊ लागला. याचवेळी तगड्या पगाराची ही नोकरी सोडून अशोकनी बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या एड्सविरोधी कॅम्पेनची निवड केली. तब्बल दोन दशकं त्यांनी यासाठी खर्ची घातली. 

या अनुभवावर त्यांनी - 'ए स्ट्रेंजर ट्रूथ : लेसन्स इन लव्ह, लीडरशिप अॅन्ड करेज फ्रॉम इंडियाज सेक्स वर्कर्स' हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक वाचताना आपल्या देशातील वेश्यांनी केलेली कमाल लक्षात येते. इतकं होऊनही यांचे बिचाऱ्यांचे अपवाद वगळता कधी कुणी साधे आभार देखील मानले नाहीत. सरकारी यंत्रणांनी तर साधा नामोल्लेखही केला नाही. सर्वसामान्य नागरिकांना यांच्या विश्वाशी घेणंदेणंच नसतं त्यामुळे या जगल्या काय किंवा मेल्या काय याच्याशी त्यांना सोयरसुतक नसतं. असं असूनही या बायकांनी जे करून दाखवलं त्यामुळेच हे संकट प्रामुख्याने टळलं असं ठामपणे म्हणता येते.

समलिंगी, ट्रान्सजेंडर्स आणि वेश्या या तीनही घटकांनी आपआपला वाटा उचलला. आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणमधून याची सुरुवात झाली. आपल्याकडे प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, शहरात आणि गावात सेक्सवर्किंगच्या ठिय्यांची, ठिकाणांची धाटणी वेगवेगळी आहे. मध्यप्रदेशात हायवेवरती, तर युपीमध्ये भकास बकाल वस्त्यात, राजस्थानमध्ये ढाब्यांवर, दक्षिणेत सार्वजनिक ठिकाणालगत, नॉर्थइस्टमध्ये ग्रामीण भागात अशी यांची वर्कसिस्टीम आहे. आंध्रमध्ये बस स्थानके, रेल्वे स्थानके, सार्वजनिक उद्याने, पार्किंग लॉट्स, बकाल वस्त्यात हा उद्योग चालतो. बिल गेट्स फाउंडेशनच्या 'आवाहन' या प्रोग्रामअंतर्गत या घटकांना सामुहिकरित्या एकत्र आणून त्यांना एड्सविषयीची माहिती देणं हे काम सर्वात कठीण होतं. चार बायका एकीकडे तर चार बायका नाक्याबाहेर तर दुसऱ्या दोन बायका कुठेतरी बसडेपोच्या मागे ! असा सगळा पाठशिवणीचा खेळ होता. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला डाटा मागितला गेला तेंव्हा त्यांनी पोलीस यंत्रणेकडे बोट दाखवले. 

माझा आजवरचा अनुभव असा आहे की, या मुद्द्यासंबंधी पोलिसांचा डाटा निव्वळ भोंगळ असतो. मागील पानावरून पुढे असा खाक्या त्यात जास्त दिसतो, फेक रेड्स आणि कुंटणखान्यातील बायकांशी चालकांशी असलेले लागेबांधे यामुळे हा धंदा जिथे चालतो तिथली खरी माहिती सरकारी कागदपत्रात कधीच आढळून येत नाही हे वास्तव आहे. यामुळे मोठी पंचाईत झाली. नेमक्या बायका किती आहेत आणि कुठे कुठे आहेत याचा कुणालाच थांगपत्ता नव्हता. लाखो अदृश्य बायकांना काही महत्वाचं सांगायचं आहे मात्र त्यांचे ठावठिकाणे हाती नाहीत अन् हाती असलेला वेळ पाऱ्यासारखा सहज वेगाने निसटून चाललेला अशी विचित्र स्थिती ओढवली. यात बऱ्याच एनजीओंनी प्रामाणिक मदतीचे प्रयत्न करून पाहिले मात्र ठोस काहीच हाती लागत नव्हते.

अखेर काही वेश्याच पुढे आल्या. यात एक होती, थेनू. थिरूवेली नेंपेल्ली. तिचं टोपणनाव थेनू. तिच्या साथीला कामाठीपुरा (मुंबई), बुधवार पेठ (पुणे), सोनागाची (कोलकता), जीबी रोड (दिल्ली), गंगा जमुना (नागपूर), कबाडी बाजार (मेरठ), नक्कास बाजार (सहारनपूर), शिवदासपूर दालमंडी (वाराणसी), रेशमपूर (ग्वाल्हेर) या मुख्य रेड लाईट एरियाशिवाय लखनौ, कानपूर, दिल्ली, आग्रा, पतियाळा, झाशी, दरभंगा, भोपाळ अशा अनेक छोट्यामोठ्या शहरातील बायका त्यांना जॉईन झाल्या. 

ग्राहकांनी निरोध न वापरता सहवास करू नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. इथे एक मोठा प्रॉब्लेम झाला जो मूलतः पुरुषांच्या सेक्सविषयक जाणिवात खोल दडलेला आहे. निरोध वापरला नाही तर खरे सुख मिळत नाही आणि पौरुषत्व घटत जातं अशा विचित्र समजुतींनी लोकांना ग्रासलेलं होतं. त्यापायी या बायकांकडे मुक्त सहवासाची मागणी होते. एड्सची भीती असूनही अनेक पुरुष या बायकांकडे निरोधशिवाय शरीरसुखाची अट ठेवत. जोवर या बायकांना एड्सचं भयावह स्वरूप माहिती नव्हतं तोवर त्या त्याला बळी पडत गेल्या, मात्र जसजशी वेश्यांना बाधा होऊ लागली तसा एकच हाहाकार या बायकांत माजला. बायका ज्यांच्यासाठी काम करत त्या अड्डेवाल्या आणि दलाल हे केवळ पैशाचे भुकेले असल्याने त्यांना याच्याशी फारसं देणंघेणं नव्हतं. खेरिज निरोध वापरण्याची जबरदस्ती केल्यास दमदाटी मारहाण होऊ लागली. काहींवर अशीच जोर जबरदस्ती केली जाऊ लागली. 2004 मध्ये मुंबईत अशा काही घटना उघडकीस ज्यात काही एड्सबाधित पुरुषांनी हेतू पुरस्सर बायकांना फसवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवून त्यांना बाधित केलं. पोलिसांपर्यंत प्रकरणे गेली मात्र यावर पुढे काहीच झालं नाही. अखेर या बायकांनी हिंमत दाखवत अशा पुरुषांना ठोकून काढण्याची तयारी करून ठेवली. 

मेरठ, जयपूर इथे अशी काही प्रकरणेही घडली. मग सर्वच वेश्यांची मानसिकता बदलली. दरम्यान सरकारी पातळीवरूनही सूत्रे वेगाने हलू लागली. वेश्यावस्तीत कॉईन बॉक्सच्या धर्तीवर निरोध बॉक्सेस ठेवण्यात येऊ लागले. एनजीओंना हाताशी धरून समुपदेशन आणि आरोग्य जागृती अभियान सुरु करण्यात आले. यातला एक महत्वाचा टप्पा धार्मिक बाबींशी निगडीत होता तो कसोटीचा मुद्दा होता. मात्र तिथेही संयमाने काम केल्याने सरशी झाली. विस्ताराने सांगता येईल मात्र इथे आपण पुणे आणि मुंबईचे उदाहरण घेऊ. पुण्यात गणेशोत्सव काळात वेश्यागमन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते, मुंबईत नववर्ष आगमनाच्या पूर्वसंध्येस वाढ जाणवते. या दोन्ही पर्वात विशेष खबरदारी घेतली जाऊ लागली. यास सामाजिक सहकार्यही मिळाले हे ही नमूद करावे लागेल.

वेश्यांकडे येणाऱ्या पुरुषांनाच निर्बंध लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा पुढचा संसर्ग टळला इतकंच याचं वार्तांकन नसून याला आणखी एक पदर आहे. तो खरं तर अखिल समाजाचा आहे मात्र आजवर त्यासाठी कुणी यांना साधे ऋणनिर्देश देखील दिले नाहीत. या बायकांकडे येणाऱ्या पुरुषांना निर्बंध लावले नसते तर एका पुरुषामुळे संसर्गाची जी साखळी सुरु झाली असती त्याचे वाहक होऊन त्याच्या संपर्कात आलेल्या वेश्येने तिच्या संपर्कात आलेल्या अनेक पुरुषांना याचा संसर्ग बहाल केला असता. आणि तितक्या पुरुषांचे त्यांच्या घरच्या स्त्रीशी संबंध आल्यानंतर तितक्याच मोठ्या प्रमाणात सामान्य पांढरपेशी स्त्रियादेखील हकनाक बाधित झाल्या असत्या. हा मुद्दा कधी सामान्य जनतेने अधोरेखित केला ना माध्यमांनी यावर कधी चर्चासत्र घेतलं. यात काही एनजीओंनी जीव लावून काम केलं तर काहींनी निव्वळ आपलं उखळ पांढरं करून घेतलं. बिलकुल अक्षरशत्रू ते अल्पशिक्षित वेश्या ज्यांना आरोग्य जतन कशाशी खातात हे माहित नाही त्यांना एका भयानक रोगाची माहिती देऊन त्याविषयीच्या अभियानात त्यांना सामील करून घेऊन त्यांच्याच आधारे सर्वसामान्य जनतेचं संभाव्य नुकसान टाळणं हे एक अशक्य कोटीतील काम होते मात्र या बायकांच्या जिद्दीमुळे ते शक्य झाले.

2007 मध्ये अरुणा सोभन हिने अशोकना एक सवाल केला होता, त्याचा उल्लेख करून लेख आटोपता घेतो. एड्सबद्दल जागृतीसाठी आरोग्यसेवक सोनागाचीते पोहोचले होते. बाधा झाल्यास शारीरिक अवस्था किती वाईट होते, रोगी माणूस कसा झिजत जातो आणि शेवटी मरण पावतो याचं मुद्देसूद वर्णन त्या बायकांना ऐकवलं जात होतं. चाळीशीत पोहोचलेली अरुणा अचानक पुढे झाली आणि म्हणाली, "बाधा झाल्यास किती वर्षांनी माणूस मरतो ?"अचानक आलेल्या या प्रश्नाने गोंधळून गेलेली आरोग्यसेविका उत्तरली, "जेमतेम दहा वर्षात माणूस मरण पावतो !" हे उत्तर ऐकून अत्यंत निर्विकारपणे थंड चेहऱ्याने अरुणाने प्रतिप्रश्न केला, "दहा वर्षे जगायचं कुणाला ? इथे खायचे वांदे आहेत. चार दिवस धंदा केला नाहीतर उपाशी मरून जाईन. धंदा सोडला तर पहिले चारपाच दिवस मनाला बरं वाटेल मात्र आमची असलियत कळली की पब्लिक लचके तोडेल, मग पुन्हा इथं यायला लागेल, मग नव्याने जम बसवावा लागतो. भुकेलं मरण्यापेक्षा साताठ वर्षे जगून मेलेलं बरं नाही का ?" तिच्या प्रश्नाने सगळे अवाक झाले. ही अतिशयोक्ती नव्हती. अरुणाच्या विचारांशी सहमत असणाऱ्या शेकडो, हजारो स्त्रियांनी एड्सच्या काळात जाणीवपूर्वक स्वतःचा बळी दिला. यात चाळीशी पार केलेल्या वेश्यांचे प्रमाण लाक्षणिक होते. ज्यांची कमाई घटलेली होती त्यांनी मृत्यूला कवटाळले. खरं तर पुरुषी मानसिकतेने केलेले हे खून होते.

माझे हे विधान अतिरंजित वाटेल मात्र कुठल्याही एनजीओला वा आरोग्य - पोलिस वा तत्सम यंत्रणेला विचारून याची खात्री करून घेऊ शकता. झालं असं होतं की, जेव्हा 2003 पासून निरोध वापरल्याशिवाय शय्यासोबतीस मोठ्या प्रमाणात नकार समोर येऊ लागले तेव्हा ज्यांची कमाई अगदी नगण्य होती त्या बायका आपल्या पोटाची आग विझवण्यासाठी अशा पुरुषांना यास राजी झाल्या होत्या. यात काही पुरुष हे एड्सबाधित असूनही जाणीवपूर्वक या बायकांच्या आयुष्याशी खेळत राहिले, त्यातून या बायका आणि त्यांच्याकडे येणारे पुरुष अशी संसर्ग साखळी होत गेली. काही बायकांनी देखील सूडाचा प्रवास म्हणून हा प्रयोग केला हे विदारक सत्य टाळू शकत नाही. 2012 नंतर जेव्हा यावर मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध झाली आणि सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात झालेल्या जागृतीमुळे व्यापक दक्षता बाळगली जाऊ लागलीय. मात्र या दोन दशकांत ज्यांनी आपलं पोटपाणी पणाला लावलं, ज्यांनी माहिती असूनही जीव टांगणीला लावले त्यांना काय मिळालं याचं उत्तर समाज नावाचा हा अजगर कधीच देऊ शकला नाही आणि देऊ शकणार ही नाही. एड्सच्या निर्मूलनात जीवाची बाजी लावणाऱ्या आणि आपलाच बळी देणाऱ्या वेश्यांना याचे साधे श्रेयदेखील आपण दिले नाही इतका आपला समाज कोत्या मनाचा आहे. वेश्या मात्र कोत्या मनाच्या नसतात हे तर याच दशकांत ठळकपणे सिद्ध झालेलं! 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget