मॅंचेस्टर युनायटेड विकत घेणार नाही, तो फक्त एक जोक होता; इलॉन मस्क यांच्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
मॅंचेस्टर युनायटेड (Manchester United) टीम विकत घेण्याची घोषणा केल्यानंतर आता ती घोषणा म्हणजे जोक होता असं इलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्पष्ट केलं आहे.
न्यूयॉर्क: आपल्या ट्वीटमुळे चर्चेत असलेल्या टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी आणखी एक वाद ओढावून घेतला आहे. मॅंचेस्टर युनायटेड (Manchester United) ही फुटबॉल टीम आपण विकत घेतोय असं त्यांनी काही तासांपूर्वी ट्वीट केलं होतं. आता आपण अशा प्रकारची कोणतीही टीम विकत घेणार नाही, तो एक जोक होता असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मस्क यांच्या या ट्वीटमुळे युनायटेड मॅंचेस्टर टीमच्या चाहत्यांमध्ये मात्र नाराजी आणि रागही निर्माण झाल्याचं चित्र आहे.
टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी आज एक ट्वीट करत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यांनी आपण इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड विकत घेत आहे अशी घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी असं काहीही करणार नाही असं स्पष्ट केलं. उलट हा जोक असल्याचं सांगितलं. इलॉन मस्क यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, हा ट्वीटरवरचा एक जोक होता. मी कोणतीही स्पोर्ट्स टीम विकत घेत नाही.
No, this is a long-running joke on Twitter. I’m not buying any sports teams.
— Elon Musk (@elonmusk) August 17, 2022
इलॉन मस्कच्या या ट्वीटनंतर मात्र मॅंचेस्टर युनायटेड टीमचे चाहते नाराज झाले आहेत. तसेच नेहमी अशा प्रकारचे काही ट्वीट्स करुन नसत्या वादात पडणाऱ्या मस्क यांच्या विरोधात अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मस्कच्या या ट्वीटवर यूजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये मँचेस्टर युनायटेड टीमच्या आठ प्रशिक्षकांनी टीमच्या प्रशिक्षकपदाला रामराम केला.
ट्विटरसोबतचा करार तुटला
इलॉन मस्क यांनी अलीकडेच सोशल मीडिया साईट ट्विटरशी केलेला करार तोडला आहे. याआधी त्यांनी ट्विटरसोबत मोठी डील केली होती. मात्र, नंतर ते या करारातून बाहेर पडले. याबाबत ट्विटरकडून मस्कविरोधात खटलाही दाखल करण्यात आला आहे. ट्विटरने म्हटले की, अब्जाधीश मस्क करारातून बाहेर पडण्यासाठी स्पॅम खाती वापरत आहेत.
मस्क नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणू शकतात
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क ट्विटरवर सुरू असलेल्या कायदेशीर लढाई दरम्यान काहीतरी मोठे करण्याची तयारी करत आहेत. रिपोर्टनुसार, इलॉन मस्क लवकरच त्यांचे नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X.com लाँच करू शकतात. याआधी मस्क यांनी ट्विटरला 44 बिलियन डॉलर्समध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर त्यांनी डीलमधून माघार घेतली. ट्विटरसोबतच्या डीलच्या वादामुळे इलॉन मस्क नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X.com लाँच करण्याचा विचार करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या व्यासपीठाच्या नावाची घोषणा खुद्द मस्क यांनी केली आहे.