Earthquake in Bangkok: 'मी 40 मजली इमारतीवरून 7.5 मिनिटांत खाली आलो', भूकंपातून बालंबाल बचावलेल्या व्यक्तीनं सांगितला अंगावर काटा आणणारा थरारक प्रसंग
Earthquake in Bangkok: बँकॉकमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीत 16 जण जखमी झाले असून 101 लोक बेपत्ता आहेत.

Earthquake in Bangkok: म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मोठा विध्वंस झाल्याचं चित्र आहे. या आपत्तीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, 16 जण जखमी झाले असून 101 लोक बेपत्ता आहेत. थायलंडच्या डिपार्टमेंट ऑफ डिझास्टर प्रिव्हेंशन अँड मिटिगेशन (DDPM) नुसार, बँकॉक आणि इतर दोन प्रांतांना आपत्कालीन आपत्ती क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. अधिकारी प्रभावित भागातील नुकसानाचे मूल्यांकन करत आहेत. डीडीपीएमचे महासंचालक फासाकॉर्न बूण्यालक यांनी सांगितले की, भूकंपामुळे14 प्रांतांमध्ये नुकसान झाले आहे.
59 मजली इमारतीच्या 40व्या मजल्यावर पोहोचले तेव्हा...
शुक्रवारी म्यानमार आणि थायलंडमधील विनाशकारी भूकंपातून वाचलेल्या लोकांनी त्यांचे थरारक अनुभव सांगितले आहेत. त्यांनी ज्या भीषण घटना आणि कठीण प्रसंगांचा सामना केला त्याबद्दल त्यांनी सांगितले. द हिंदूच्या वृत्तानुसार, बँकॉकमध्ये राहणारे 55 वर्षीय अकाउंट्स आणि टॅक्स कन्सल्टंट एसके जैन शुक्रवारी मीटिंगसाठी सिलोम भागातील ज्वेलरी ट्रेड सेंटर (जेटीसी) येथे गेले होते. दुपारी 1:16 वाजता, जेव्हा ते 59 मजली इमारतीच्या 40व्या मजल्यावर पोहोचले तेव्हा त्यांनी एका सहकाऱ्याला मेसेज पाठवला की तो नंतर परत येईल. मात्र, दोनच मिनिटांत संपूर्ण इमारत हादरू लागली. भूकंपाच्या वेळी ते एका उंच इमारतीत अडकल्याची आठवण जैन यांनी सांगितली.
ते म्हणाले, 'हा माझ्या आयुष्यातील एक भयानक अनुभव होता, माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षण होता. मी प्रंचड खूप घाबरलो होतो. पहिला धक्का दुपारी 1:18 वाजता जाणवला. मी ज्या रूममध्ये होतो, त्या खोलीतील पडदे एक फुटापेक्षा जास्त हलू लागले. ते सगळं खूप भीतीदायक दिसत होतं. आम्ही सगळे पटकन पायऱ्यांकडे धावलो. काही लोकांनी सांगितले की, त्यांनी आठ आणि 10 कॅरेटचे हिरे टेबलावर ठेवले होते.
ते पुढे म्हणाले, 'आम्ही 21व्या मजल्यावर पोहोचलो तेव्हा आम्हाला दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. त्यावेळी आम्ही 18व्या ते 21व्या मजल्यावर होतो. पायऱ्या जोरात थरथरू लागल्या. मी त्यावेळी मनात देवाचा धावा करत होतो. मला वाटले की, मी खाली उतरू शकणार नाही, पण कसा तरी मी 7.5 मिनिटांत 40 मजले खाली पोहोचलो. माझ्यासोबत 1,500 हून अधिक लोकही उतरले. घाईघाईत अनेकांचे फोनही ऑफिसमध्येच राहिलेले होते.
अनेकांना आधाराशिवाय उभे राहताही...
असाच प्रकार 56 वर्षीय शिखा रस्तोगीसोबत घडला. बँकॉकमधील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमध्ये काम करणारी शिखा तिच्या सहकाऱ्यांसोबत 'द बिग ट्री' रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असताना भूकंपाचे धक्के बसले. त्यावेळी ती तिच्या आजारी पतीशी फोनवर बोलत असताना हॉटेलमध्ये असलेलं झुंबर झपाट्याने हलू लागलं. रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेले सर्वजण घाबरले आणि बाहेर पळू लागले. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, अनेकांना आधाराशिवाय उभे राहताही आले नाही. त्यांची व्हॅन दुपारी दीड वाजता हॉटेलमधून निघाली, पण रस्त्यांवर इतकी जास्त गर्दी होती की त्यांच्या सहकाऱ्यांना घरी पोहोचायला रात्री साडे नऊ वाजले. मात्र, सुदैवाने ती तीन तासांत घरी पोहोचली.
शिखाने सांगितले की, 'मी घरी पोहोचले तेव्हा आमची इमारत बंद होती. मुख्य रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या अपार्टमेंटच्या गल्लीत पोलिसांनी मला प्रवेश दिला नाही. मला त्यांना समजावून सांगावे लागले की, मी तिथे राहते आणि मला माझ्या आजारी पतीकडे जायचे आहे. ती पुढे म्हणाली, 'मी आत गेल्यावर माझ्या पतीला शोधण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला अंधार होता, दुकानं बंद होती आणि मी खूप घाबरले होते. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला एका खांबाचा आधार घेऊन बसलेलं पाहिलं.























