ट्रम्प यांच्या निवासस्थानी आढळलेले 15 पैकी 14 बॉक्स अमेरिकेच्या सुरक्षेशी संबंधित, FBIचा खळबळजनक दावा
Raids On Donald Trump's House : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानी आढळलेले 15 पैकी 14 बॉक्स अमेरिकेच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचा दावा FBI नं आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
Donald Trump : अमेरिकेची (America) तपास संस्था एफबीआयनं काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या फ्लोरिडा येथील घरावर छापेमारी केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर टाकलेल्या छाप्यात 15 बॉक्स सापडल्याचा खुलासा एफबीआयनं (FBI) शुक्रवारी केला आहे. यापैकी 14 बॉक्समधून अमेरिकेच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. एफबीआयनं शुक्रवारी एक शपथपत्र जारी करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मार-ए-लागो रिसॉर्ट'वर टाकलेल्या छाप्यांचं स्पष्टीकरण दिलं. 32 पानी प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी तपासाशी संबंधित अनेक माहिती देण्यात आली आहे.
एफबीआयनं म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये डझनभर गोपनीय दस्तऐवज ठेवले आहेत.
सुधारित प्रतिज्ञापत्र केलं जारी
तपासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे तपशील जारी करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आलं आहे. तसेच, FBI अधिकाऱ्यांनी साक्षीदारांची ओळख आणि तपासाची कार्यपद्धती टाळण्यासाठी काही सुधारणा देखील केल्या आहेत. एफबीआयनं हे प्रतिज्ञापत्र एका न्यायाधीशाला ट्रम्प यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यासाठी वॉरंट मिळवण्यासाठी दिलं होतं.
अधिकृत कागदपत्रांच्या शोधासाठी होती एफबीआयची छापेमारी
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर फ्लोरिडामध्ये आणलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाशी संबंधित अधिकृत कागदपत्रं शोधण्यासाठी एफबीआयनं छापेमारी केल्याचं यापूर्वीच सांगण्यात आलं आहे. सध्या न्याय विभाग ट्रम्प यांच्याविरोधातील दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याच्या प्रयत्नाबाबतचं पहिलं प्रकरण आणि कागदपत्रं हाताळण्यासंदर्भातील दुसरं प्रकरण, यासंदर्भात सध्या चौकशी सुरु आहे. एप्रिल-मे महिन्यातही तपास यंत्रणेनं या प्रकरणात ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी केली होती.
FBI च्या मते, एजन्सी प्रेसिडेंशियल रेकॉर्ड्स अॅक्ट आणि वर्गीकृत साहित्य हाताळणी कायद्यांच्या संभाव्य उल्लंघनांची चौकशी करत आहे. नॅशनल आर्काइव्हज अँड रेकॉर्ड अॅडमिनिस्ट्रेशन (NARA) ने 2022 मध्ये व्हाईट हाऊसच्या रेकॉर्डचे 15 बॉक्स जप्त केले. हे बॉक्स 'मार-ए-लागो'ला (डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्लोरिडातील निवासस्थान) पाठवले गेले. त्यावेळी NARA ने सांगितलं की, नियमांनुसार कागदपत्रांनी भरलेले हे बॉक्स ट्रम्प जेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले, तेव्हा नॅशनल आर्काइव्हजला पाठवायचे होते.
ट्रम्ह म्हणाले होते, हा तर काळा दिवस
ट्रम्प यांनी FBI च्या छाप्याबाबत एक निवेदन जारी करून माहिती दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, एफबीआय अधिकाऱ्यांनी फ्लोरिडातील पाम बीचवर असलेल्या 'मार-ए-लागो'वर छापा टाकून निवासस्थान ताब्यात घेतलं होतं. ट्रम्प म्हणाले होते, "ही आपल्या देशासाठीची काळी वेळ आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबाबत यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. हा प्रकार म्हणजे, न्याय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर करण्यासारखं आहे."