(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रिटनमध्ये टोमॅटो, काकडीचे दर कडाडले, एका काकडीसाठी मोजावे लागतात 42 रुपये
UK Crisis : रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम ब्रिटनमधील शेतीच्या व्यवसायावर होऊ लागला आहे. ब्रिटनमध्ये टोमॅटो, काकडीची टंचाई निर्माण झाली आहे.
UK Crisis : ब्रिटनच्या बाजारातून काकडी, मिरची, टोमॅटो आदी भाज्यांची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. या टंचाईमुळे दर कडाडले आहेत. ब्रिटनच्या सुपरस्टोअरमध्ये एका काकडीसाठी 42 रुपये मोजावे लागत आहेत. काकडी पिकवण्यासाठी उष्ण वातावरणाची आवश्यकता असते. ब्रिटनमध्ये काकडीचे उत्पादन घेण्यासाठी ग्लास हाउसेस तयार केले जातात. हे ग्लास हाउसेस उष्ण ठेवण्यासाठी नैसर्गिक वायूचा वापर केला जातो. रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रिटनमध्ये नैसर्गिक वायूंचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे ग्लास हाऊसेसचे मालक महागडा गॅस खरेदी करून काकडीचे उत्पादन घेण्यास फारसे उत्सुक नाहीत.
ब्रिटनमध्ये मागील वर्षाच्या अखेरपासूनच गॅसच्या दरात वाढ होऊ लागली होती. त्यामुळे ग्लास हाऊसेसमध्ये शेती करणारे शेतकरी मिरची, वांगी, टोमॅटोचे उत्पादन घेऊ शकली नाहीत. यामुळे ब्रिटनमध्ये या भाज्यांच्या दरात वाढ झाली. भाज्यांच्या टंचाईवर मात करण्यासाठी ब्रिटनने आयातीला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. मात्र, जे शेतकरी या पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक असल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
ब्रिटनमध्ये भाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी गॅसची आवश्यकता असते. यामुळे शेतकऱ्यांना काही वेळेस प्रतिकूल हवामानाचा सामना करणे शक्य होते. मात्र, गॅस दरवाढीने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. टोनी मोंटालबानो या शेतकऱ्याने सांगितले की, आमचे कुटुंबीय 54 वर्षापासून काकडीची शेती करत आहे. मात्र, यंदा आमच्या अडचणीत वाढ झाली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास आम्हाला काकडीची शेती करणे थांबवावे लागेल असेही त्यांनी सांगितले.
काकडीचे दर वाढल्याने हॉटेलमधून काकडीचा समावेश असलेले खास पदार्थ आता मिळेनासे झाले आहेत. येत्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी परदेशातून येणाऱ्या प्रेक्षकांना यंदा लंडनमधील मोठ्या हॉटेलमध्ये मिळणारे काकडी सँडविच उपलब्ध होणार नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- LPG Price Hike : एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
- Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत महागाईने तोडले सर्व रेकॉर्ड, पेट्रोलपेक्षाही दूध महाग, पेट्रोल पंपावर हाणामारी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha