(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Subvariants : ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटवर आलं प्रभावी औषधं, अमेरिकेनंतर इतर देशातही होणार उपलब्ध, मृत्यूदर घटणार
Omicron Subvariants : ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटवर अमेरिकेनं बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) हे परिणामकारक औषध शोधून काढलं आहे.
Omicron Subvariants : ओमायक्रॉनच्या सबव्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातलाय. त्यावर लस अथवा औषध शोधण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटवर अमेरिकेनं बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) हे परिणामकारक औषध शोधून काढलं आहे. याचा वापर सध्या अमेरिकेत सुरु आहे. पण या औषधांची परिणामकारकता तपासण्यासाठी अमेरिकेतील सशोधकांनी इतर देशांनाही याचा वापर करण्याचं आवाहन केले आहे.
अमेरिकेतील संशोधकांनी ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरियंटविरोधात बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) हे औषध शोधलं आहे. याची परिणामकारकता अमेरिकेत दिसून येत आहे. पण BA.4 आणि BA.5 हा सब व्हेरियंट जगभरात पसरला आहे. त्यामुळे अमेरिकेतील संशोधकांनी जगभरातील देशांना या औषधांचा वापर करण्याचं आवाहन केलेय. ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरियंटविरुद्ध बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) हे औषध अधिक प्रभावी असल्याचे प्रारंभिक तपासण्यात समजलं आहे. त्यामुळेच आता याची अधिक परिणामकारकता तपासण्यासाठी अमेरिकेबाहेरही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरियंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक देशात या सब व्हेरिटयंटचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जगभराची चिंता वाढली आहे. परिणामी प्रत्येक देशानं याच्याविरोधात प्रभावी औषधाचा शोध सुरु केला. अमेरिकेला यामध्ये यश आलं आहे.
सुरुवातीला कोरोनावर मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचारांचा वापर करण्यात आला. सुरुवातीला याचा प्रभाव दिसून आला. पण विषाणू सातत्याने आपलं रुप बदलत असल्यामुळे मोनोक्लोनल अँटीबॉडीचा प्रभाव कमी होतं असल्याचं समजलं. त्यानंतर ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरियंटविरोधात बेब्टेलोव्हिमॅब याचा वापर करण्यात आला. हे औषधं ओमायक्रॉन सबव्हेरियंटच्या उत्परिवर्तित स्पाइक प्रथिनांना लक्ष्य करण्यासाठी प्रभावी असल्याचं जिनिव्हा विद्यापीठातील ग्लोबल हेल्थ संस्थेचे संचालक एंटॉइन फ्लॅहॉल्ट यांनी सांगितले.
अमेरिकन फार्मास्युटिकल फर्म एली लिली कंपनीने बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) या औषधाची निर्मिती केली आहे. सध्या अमेरिकेत आपतकालीन परिस्थितीमध्ये या औषधाचा वापर केला जातो. त्याचा परिणामही सकारात्मक दिसून येत आहे. ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरियंटविरोधात प्रभावी असल्याचं दिसून येत आहे. परंतु, ओमायक्रॉनचा BA.4 आणि BA.5 हा सब व्हेरियंट अनेक देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे इतर देशांमध्येही या औषधांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हे औषध फक्त अमेरिकेतच वापरलं जातेय. एली लिली कंपनीने बेब्टेलोव्हिमॅब या औषधांमुळे मृत्यूदरही आटोक्यात येत असल्याचा दावा केला आहे.
बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) ला अमेरिकेत अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. पण आपत्कालीन वापराला मंजूरी देण्यात आली आहे. 2022 च्या सुरुवातीला सौम्य आणि मध्यम कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) या औषधांचा वापर करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे. फेब्रुवारीमध्ये अमेरिकेनं एली लिली कंपनी कंपनीकडे बेब्टेलोव्हिमॅबच्या सहा लाख डोसची ऑर्डर दिली होती. त्यानंतर आता गेल्या महिन्यात एक लाख 50 हजार डोसची ऑर्डर दिली आहे.
गेल्या आठवड्यात युरोपमधील पाच वैद्यकीय संशोधकांनी लॅन्सेट जर्नलमध्ये बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) या औषधांबाबत सविस्तर लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी बेब्टेलोव्हिमॅब (Bebtelovimab) हे औषधं ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटविरोधात प्रभावी असल्याचं म्हटलेय. तसेच अमेरिकेबाहेरही याचा वापर व्हावा, अशी सूचनाही त्यांनी केली होती. दरम्यान, ओमायक्रॉनच्या BA.5 हा या सब व्हेरियंटविरोधात सध्या बेब्टेलोव्हिमॅब हे एकमेव प्रभावी औषध आहे. त्यामुळे फ्रान्समध्ये ते लवकरात लवकर उपलब्ध करा, अशी सूचना फ्रान्सच्या कोविड सायंटिफिक कौन्सिलने बुधवारी केली.