Cough Syrup : भारतनिर्मित आणखी एक कफ सिरप दूषित असल्याचा WHO चा दावा, अलर्ट जारी; पंजाबमधील कंपनीने आरोप फेटाळाले
Cough Syrup : मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये आढळलेले एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. तर पंजाबमधील QP फार्माकेम लिमिटेडने हे आरोप फेटाळले आहेत.
Cough Syrup : भारतात तयार होणाऱ्या आणखी एका कफ सिरपच्या (Indian Cough Syrup) गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वैद्यकीय इशारा जारी करुन भारतात तयार केलेलं कफ सिरप दूषित असल्याचं म्हटलं आहे. मार्शल आयलंड (Marshall Islands) आणि मायक्रोनेशियामध्ये (Micronesia) आढळलेले एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटलं आहे. हे सिरप पंजाबमधील (Punjab) क्यूपी फार्माकेम या कंपनीचं असून हरियाणातील (Haryana) ट्रिलियन फार्मा ही कंपनी सिपरचं वितरण करते असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
दूषित घटक आढळल्याचं चाचणीत समोर : WHO
परंतु भारतील कंपनीनिर्मित या कफ सिरपमुळे जीवितहानी झाली आहे की नाही, याचा उल्लेख डब्लूएचओने अलर्टमध्ये केलेला नाही. मात्र, डब्लूएचओने म्हटलं आहे की मार्शल आयलंडमधील ग्वाफेनेसिन सिरप टीजी सिरपचे (GUAIFENESIN SYRUP TG SYRUP) नमुने ऑस्ट्रेलियाच्या थेरप्यूटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशन (टीजीए) च्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत तपासण्यात आले. याच्या निकालानुसार सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol) आणि इथिलीन ग्लायकोल (Ethylene Glycol)हे दूषित घटक आढळले. त्याच्या वापरामुळे मानवाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. 6 एप्रिल रोजी ही माहिती WHO ला देण्यात आली होती.
दरम्यान, WHO च्या या इशाऱ्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्रांचं म्हणणं आहे की डब्लूएचओचा ई-मेल मिळाल्यानंतर हरियाणा आणि पंजाब सरकारांना या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती.
पंजाब आणि हरियाणातील कंपन्यांचं नाव समोर
WHO ने माहिती दिली आहे की पंजाबची QP फार्माकेम लिमिटेड कंपनी या कफ सिरपचे उत्पादन करते. कंपनीने इतर देशांमध्ये वितरणासाठी हरियाणा इथल्या ट्रिलियम फार्मा नावाच्या कंपनीशी करार केला आहे. WHO ने सर्व सदस्य देशांना हे कफ सिरप वापरु नये असं आवाहन केले आहे. या दोन्ही कंपन्यांनी कप सिरपच्या सुरक्षितता आणि गुणवत्ता याबाबत कोणतीही हमी दिलेली नाही, असं डब्लूएचओचं म्हणणं आहे.
कालबाह्य कफ सिरपचे नमुने तपासले : QP फार्माकेम लिमिटेडचा दावा
दरम्यान एक्स्पायर्ड अर्थात कालबाह्य झालेल्या कफ सिपरचे नमुने तपासल्याचा दाव्याचा क्यूपी फार्माकेम लिमिटेडने केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आम्हाला लूपमध्ये न ठेवता आमच्या उत्पादनांच्या कालबाह्य नमुन्यांची चाचणी केली, असं क्यूपी फार्माकेम लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाठक यांनी सांगितलं. तसंच हे सिरप 2020 मध्ये कंबोडियाला पाठवलं होतं, ऑस्ट्रेलियाला नाही. डब्ल्यूएचओने सिरपचे घेतलेले नमुने हे फार पूर्वीच कालबाह्य झाले आहेत, आणि या चाचणीचा निकाल आता वैध ठरत नाही," असंही सुधीर पाठक म्हणाले. सिरप बनवताना कंपनीने अतिशय काळजी आणि खबरदारी घेतली आहे. त्यामुळे ते दूषित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे कप सिरप भारतातही वितरित करण्यात आलं होतं, मात्र आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही, असा दावा सुधीर पाठक यांनी केला. पंजाब सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभाग आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) चाचण्यांसाठी या कफ सिरपचे नमुने गोळा केले आहेत. सध्या या चाचणीच्या निकालची प्रतीक्षआ आहे. परंतु आमचं कफ सिरप या गुणवत्ता चाचणीत पास होईल, यावर पूर्ण विश्वास आहे, असंही सुधीर पाठक यांनी म्हटलं.
याआधी भारतनिर्मित औषधांवर प्रश्न
दरम्यान भारतात बनवलेल्या औषधांना रेड सिग्नल मिळाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी सोनीपथमधील मैदान फार्मा कंपनीने तयार केलेल्या सर्दी खोकल्याच्या औषधामुळे गॅम्बियामधील 66 पेक्षा जास्त मुलांच्या मृत्यू झाल्याचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या अलर्टमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये, नोएडामधील मेरियन बायोटेकने बनवलेल्या कफ सिरपचं सेवन केल्यामुळे 18 बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला होता. तर या महिन्यातच म्हणजे एप्रिल 2023 मध्ये, USFDA ने चेन्नईमधील ग्लोबल फार्मानिर्मित डोळ्यांच्या औषधामुळे यूएसमधील तीन जणांचा मृत्यू झाला तसंच अंधत्त्व आल्याचा दावा केला होता. तर आता मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये आढळलेले एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )