Uzbekistan Children Death: उज्बेकिस्तानमध्ये कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू, भारताच्या औषध कंपनीवर आरोग्य मंत्रालयचा आरोप
Uzbekistan Children Death: गँबियानंतर आता उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाला आहे.
Uzbekistan Children Death: गँबियानंतर आता उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठी भारतीय औषधाच्या कंपनीला जबाबदार धरले आहे. आरोग्य मंत्रालयने सांगितलं की, मृत झालेल्या 18 मुलांनी नोएडा येथील मॅरियन बायोटेकमध्ये तयार झालेल्या डॉक-1 मॅक्स सिरपचं सेवन केले होतं.
उज्बेकिस्तानच्या आरोग्य मंत्रलयाने 18 जणांच्या मृत्यूसाठी भारताला जबाबदार धरलेय. गँबियामध्ये 66 मुलांचा कप सिरपच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचं प्रकरण शांत होतं ना होतं तोच हे नवीन प्रकरण समोर आले आहे. उज्बेकिस्तान सरकार म्हटलेय की, मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. ही कंपनी 2012 मध्ये उज्बेकिस्तानमध्ये रजिस्टर्ड झाली होती.
थेट आरोप नाहीच -
'मृत मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोन ते सात दिवस डॉक-1 मॅक्स सिरप दिवसातून तीन ते चार वेळा सेवन केले होतं. याची मात्रा 2.5-5 ML यादरम्यान असेल. जी मुलांसाठी औषधाच्या प्रमाणित डोसपेक्षा जास्त आहे, असे उज्बेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलेय.' औषधांमध्ये कोणत्या प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचा थेट आरोप निवेदनात करण्यात आलेला नाही. निवेदनात म्हटले की, ' औषधांमध्ये प्रामुख्याने पॅरासिटामोल आहे, ज्याचा वापर आई-वडिलांनी चुकिच्या पद्धतीनं केला आहे. त्यांनी डॉक्टरांच्या परवानगीशिवाय मेडिकलमधून खरेदी केलं. मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास झाल्यानंतर सिरपचा वापर करण्यात आलाय. '
कोणत्या केमिकलला धरलं जबाबदार -
रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीच्या लॅब टेस्टमध्ये असं समोर आलेय की डॉक-1 मॅक्स सिरपमध्ये एथिलीन ग्लायकॉल आहे. आरोग्य मंत्रालयाने या केमिकलचा संदर्भ देत म्हटलेय की, 'एथिलीन ग्लायकॉल एक विषारी पदार्थ आहे. याच्या सेवनामुळे उलट्या, मूर्च्छा, आकुंचन, हृदयाच्या समस्या आणि मूत्रपिंड निकामी होण्यासारखे आजार होऊ शकतात.' याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणा दाखवून कामावरुन काढून टाकलं आहे. त्याशिवाय अनेक तज्ज्ञांवर शिस्तभंगाची कारवाईही करण्यात आलेली आहे.
औषधं मेडिकल स्टोरमधून काढली -
डॉक-1 मॅक्स औषधांच्या टॅब्लेट आणि सिरपला सर्व मेडिकल स्टोअरमधून हटवण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने पालकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्याशिवाय डॉक्टरांच्या पर्चीशिवाय अथवा परवानगीशिवाय कोणतेही औषध देऊ नका, असा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं गँबियातील मेडेन फार्माने बनवलेल्या चार कफ सिरपसाठी अलर्ट जारी केला होता. या कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू झाला होता. गँबियातील मुलांच्या मृत्यूसाठी ज्या चार कफ सिरपवर जागतिक आरोग्य संघटनेनं आक्षेप घेतला. त्यामध्ये प्रोमेथोजिन ओरल सोल्यूशन, मॅग्रीप एन कोल्ड सिरप, कोफेक्समॅलिन बेबी कफ सिरप आणि मकॉफ बेबी कफ सिरप यांचा समावेश होता.या औषधांमध्ये आरोग्याला घातक असे काही घटक असल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेने तपास करण्याचे आदेश दिले होते.