Volcano Eruption : कांगोमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे 15 जणांचा मृत्यू, 500हून जास्त घरांचं नुकसान
पूर्व कांगोमध्ये तब्बल दोन दशकांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अनेक खेड्यांवर याचे थेट परिणाम झाले आहेत.
गोमा : पूर्व कांगोमध्ये तब्बल दोन दशकांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अनेक खेड्यांवर याचे थेट परिणाम झाले आहेत. या संकटामध्ये तब्बल 500हून अधिक घरं नष्ट झाली आहेत. तर, जवळपास 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती दिली आहे.
युनिसेफनं दिलेल्या माहितीनुसार कांगोतील गोमा या शहरानजीक असणारा ज्वालामुखी माऊंट नीरागोंगोचा शनिवारी उद्रेक झाला. ज्यामुळं जवळपास 5 हजार नागरिकांना गोमा सोडत स्थलांतरीत व्हावं लागलं. तर, इतर 25 हजार नागरिकांनी येथील उत्तर पश्चिमेकडे असणाऱ्या साके शहरात शरण घेतली.
सदर संकटानंतर 170 मुलं बेपत्ता असल्याचं कळत आहे. युनिसेफच्या माहितीनुसार अशा मुलांच्या मदतीसाठी या भागात शिबिरी लावण्यात येती ज्यांना कोणाचाही आधार नाही आणि या संकटाच्या कचाट्यात ते एकटे पडले आहेत. यापूर्वी 2002 मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामघ्ये शेकडो जणांचा मृत्यू ओढावला होता. तर, 1 लाखाहून अधिक नागरिक बेघर झाले होते.
इस्रायल-पॅलेस्टाईन वादात जग विभागलं, जाणून घ्या कोणता देश कोणासोबत उभा आहे
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली आणि या भागात धूर, धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं, क्षणार्धात धगधगत्या लाव्हारसाने सर्वकागी गिळंकृत करण्यास सुरुवात केली आणि जीव वाचवण्याच्या आक्रोशानं इथं एकच गोंधळ पाहायला मिळाला.