Chinese Apps : भारताचा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक', 200 हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी
Chinese Apps Ban : भारताने चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. केंद्र सरकारने 200 हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
India Ban China Apps : केंद्र सरकारने (Government of India) पुन्हा एकदा चिनी मोबाईल ॲप्सवर (Chinese Apps) मोठी कारवाई केली आहे. सरकारने 200 हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी (Chinese Apps Ban) घालण्याचा निर्णय घेतला आहे. या ॲप्सच्या मदतीने चीनकडून भारतात बेकायदेशीर कर्ज, सट्टेबाजी आणि जुगाराचा व्यवसाय चालवला जात होता. यामुळे भारत सरकारने कठोर पाऊलं उचलतं चीनवर 'डिजिटल स्ट्राईक' केला आहे. यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे. याआधीही भारत सरकारने अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे.
232 चिनी ॲप्सवर बंदी
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics and Information Technology) गृह मंत्रालयाच्या सूचनांनुसार 232 चिनी ॲप्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. बेटिंग, जुगार आणि मनी लाँड्रिंगसारख्या गैरप्रकारांमध्ये गुंतलेल्या 138 ॲप्सना ब्लॉक करण्याचा आदेश 4 फेब्रुवारीलाच जारी करण्यात आला. यासोबतच अनधिकृत प्रकारे कर्ज देणाऱ्या 94 ॲप्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मधल्या काळात बेकायदेशीर कर्जसेवा देणाऱ्या ॲपमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं, कारण कर्ज आणि त्यावरील व्याज फेडणं ग्राहकांसाठी कठीण झाल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.
On a communication from the Ministry of Home Affairs, the Ministry of Electronics and Information Technology (MeitY) has initiated the process to ban and block 138 betting apps and 94 loan lending apps with Chinese links on an “urgent” and “emergency” basis. pic.twitter.com/TDGnEIvNtr
— ANI (@ANI) February 5, 2023
भारताचा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक'
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने या आठवड्यात अनेक चिनी ॲप्सवर बंदी घालण्याची शिफारस माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला (MeitY) केली होती. आता मंत्रालयाने यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. हे चिनी ॲप्स IT कायद्याच्या कलम 69 चे उल्लंघन करतात. यामध्ये भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका निर्माण करणारा मजकूर आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कारवाई करत हे ॲप्स बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ॲप्सवर कारवाई करण्याचं कारण काय?
चीनसोबतच इतर अनेक परदेशी संस्थाही हे सर्व ॲप चालवत होत्या. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 232 चिनी ॲप्स बंद करण्यात आले आहेत. हे ॲप्स देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करत होते. मात्र, सरकारने कोणते ॲप ब्लॉक केले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
ॲप्समागे चीनचं मोठं षड्यंत्र
मिळालेल्या माहितीनुसार, चीन या ॲप्सच्या माध्यमातून मोठं षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न करत होता. भारतात हे ॲप्स ऑपरेट करण्यासाठी भारतीयांना नियुक्त करण्यात आलं. लोकांना या अप्सद्वारे कर्जाचं आमिष दाखवण्यात आलं. झटपट कर्ज मिळण्याच्या ऑफरवर ग्राहकांनी कर्ज घेतल्यानंतर त्यावर वार्षिक व्याज 3,000 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं. कर्जदार व्याज भरण्यास असमर्थ असल्याचे कळताच ॲप्ससाठी काम करणाऱ्या लोकांनी कर्जदारांना त्रास देण्यास सुरुवात केली.
कर्जदारांना धमकीचे मेसेज पाठवण्यात आले. पीडितांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली गेली. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ॲप्सद्वारे बेटिंगमध्ये पैसे गमावलेल्या लोकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. सूत्रांच्या माहितीनुसार, तेलंगणा, ओडिशा आणि उत्तर प्रदेश तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी या चिनी ॲप्सवर कारवाई करण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. यावरून, गृह मंत्रालयाने सहा महिन्यांपूर्वी 28 चीनी कर्ज देणार्या ॲप्सचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली.