(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या' देशात कोरोनाची लस घेतल्यानंतर रेस्टॉरन्टमध्ये मोफत जेवण, बीयर, दारू, गांजा आणि बरंच काही....
चीनमध्ये कोरोनाच्या लसींचा साठा मुबलक असताना तिथले नागरिक मात्र कोरोनाची लस टोचून घेण्यास अनुत्साही आहेत. त्यावर उपाय म्हणून मग चीनी सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे
Corona : जगातील अनेक देशांत कोरोनाची लस अजूनही उपलब्ध झाली नसताना काही देशांत मात्र लसीचा साठा मुबलक प्रमाणात असतानाही लोक कोरोनाची लस टोचून घेण्यास अनुत्साही असल्याचं दिसून आलंय. चीनलाही हीच समस्या भेडसावत असून त्यावर आता चीनी सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे. नागरिकांनी कोरोना लस टोचून घेतली तर त्या बदल्यात त्यांना रेस्टॉरन्टमध्ये मोफत जेवण, बीयर, दारू, गांजा अशा अनेक ऑफर्स चीनी सरकारकडून देण्यात येत आहेत.
चीनमध्ये कोरोनाच्या अनेक कंपनीच्या वेगवेगळ्या लसी उपलब्ध आहेत. पण तरीही त्या देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती मिळत नाही. देशातील नागरिक कोरोना लस टोचून घ्यायला अनुत्साही दिसत आहेत. मग यावर उपाय म्हणून चीनच्या सरकारने आणि खासगी कंपन्यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. नागरिकांनी कोरोना लस टोचून घेतली तर त्या बदल्यात त्यांना रेस्टॉरन्टमध्ये मोफत जेवण, बीयर, दारू, गांजा अशा अनेक ऑफर्स चीनी सरकारकडून देण्यात येत आहेत.
पण जर नागरिकांनी कोरोनाची लस टोचून घेतली नाही तर मात्र त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार असल्याचं खासगी उद्योगांनी स्पष्ट केलंय. तसेच अशा नागरिकांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात येईल आणि त्यांच्या घरावरही जप्ती येऊ शकेल असं चीनी सरकारने स्पष्ट केलंय. त्यामुळे कोरोनाची लस न घेणं आता चीनी नागरिकांना महागात पडण्याची शक्यता आहे.
अमेरिकेत एक दिवसाची सुट्टी आणि कॅश मिळणार
अमेरिकेत काही खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस टोचून घ्यावी म्हणून एक दिवसाची सुट्टी आणि कॅश देण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणाच्या केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी कॅबचे भाडे म्हणून 2200 रुपये देण्यात येणार आहेत.
भारतासह जगभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहे. कोरोनाच्या संकटावर जर मात करायची असेल तर कोरोनाची लसच महत्वाचे शस्त्र असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
एकीकडे चीनमध्ये ही परिस्थिती असताना जगात दुसरीकडे असे अनेक देश आहेत की ज्यांना अद्यापही कोरोनाच्या लसीचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे त्या देशांत कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली नाही.