Terrorist Sajid Mir : चीनने पुन्हा खो घातला, 26/11 मुंबई हल्ल्याचा दहशतवादी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला
Terrorist Sajid Mir : साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनने पुन्हा एकदा खो घातला आहे. भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये हा प्रस्ताव मांडला होता.
Terrorist Sajid Mir : साजिद मीर (Sajid Mir) याला जागतिक दहशतवादी घोषित (Global Terrorist) करण्याच्या प्रस्तावाला चीनने (China) पुन्हा एकदा खो घातला आहे. भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये (United Nations) हा प्रस्ताव मांडला होता. साजिद मीर हा पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी असून तो मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता. चीनने याआधीही साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला होता. अमेरिकन तपास संस्था एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत साजिद मीरचा समावेश आहे. पाकिस्तानने कायमच साजिद मीरचे अस्तित्व नाकारलं आहे. साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र, साजिद मीर जिवंत असून तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या ताब्यात असल्याचे गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
चीनने आधी किती वेळा खो घातला?
दरम्यान, अलिकडच्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या असलेल्या अनेक दहशतवाद्यांची जागतिक दहशतवादी म्हणून घोषणा करण्याचे अनेक प्रस्ताव चीनने रोखले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनने लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा मुलगा तलहा सईदला दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव रोखून धरला होता. हा प्रस्ताव भारताने मांडला होता तर अमेरिकेने त्याला सहकार्य केलं होतं.
मागील काही महिन्यांत चीनने भारत-अमेरिकेचा प्रस्ताव पाच वेळा रोखले होते. लष्कर-ए-तोएबाचा सदस्य शाहिद महमूद ऑक्टोबरमध्ये, लष्कर-ए-तोएबाचा दहशतवादी साजिद मीर सप्टेंबरमध्ये, लष्कर ए तोएबा आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या अब्दुल रहमान मक्की जूनमध्ये तसेच ऑगस्टमध्ये जैश-ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर यांना चीनने संरक्षण दिले होते.
साजिद मीर जिवंत की मृत?
साजिद मीर जिवंत असल्याचा दावा गेल्या वर्षी जपानी मीडिया निक्की एशियाच्या वृत्तामध्ये करण्यात आला होता. या वृत्तात एफबीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं होतं की साजिद मीर जिवंत असून कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. पाकिस्तानने साजिद मीरच्या मृत्यूची अधिकृत माहिती भारताला दिली आहे. साजिद मीरचा एकतर मृत्यू झाला आहे किंवा त्याच्या ठावठिकाणाबाबत काहीही माहिती नाही, असं पाकिस्तानने म्हटलं होतं.
कोण आहे साजिद मीर?
साजिद मीर हा लष्कर ए तोयबाशी संबंधित दहशतवादी आहे. साजिद मीर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असून 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील त्याच्या सहभागासाठी वॉन्टेड आहे. भारत आणि अमेरिका दशकभरापासून साजिद मीरचा शोध घेत आहेत. डेव्हिड कोलमन हेडलीसोबत त्याने मुंबईतील दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. तसंच हल्ल्यादरम्यान पाकिस्तानमधील नियंत्रकांपैकी एक होता. साजिद मीर हा लष्कर ए तोयबाचा नेता हाफिज सईदचा जवळचा मानला जातो. संयुक्त राष्ट्राने यापूर्वीच हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोएबा यांच्यावर बंदी घातली आहे.
हेही वाचा