(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रिटनच्या शाही राजवाड्यात हाऊसकीपिंगची भरती सुरु, तब्बल 18.5 लाखांचे वेतन देणार!
ब्रिटीश रॉयल फॅमिली हाऊसकीपिंग या जागेसाठी भरती करत आहे आणि तुम्हीही अर्ज करु शकता. या पदासाठी तब्बल £19,140.09 म्हणजे 18.5 लाख इतका पगार असणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 13 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लंडन: ब्रिटीश राजघराण्याबद्दल म्हणजे रॉयल फॅमिलीबद्दल कुतूहल नसणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. राजघराणे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्याबद्दलच्या बातमीत प्रत्येकजण रस दाखवतो. आता ब्रिटनच्या शाही राजवाड्यात हाऊसकीपिंगची जागा भरायची आहे. ही माहिती स्वत: राजघराण्याने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केली आहे. भरती करण्यात येणारी ही हाऊसकीपिंगची जागा अॅप्रेंटिसशिप वर्ग 2 या प्रकारातील आहे. या जागेसाठी निवड झालेल्या उमेदवाराला रॉयल पॅलेसमध्येच राहावे लागणार आहे. त्याला विंडसर कॅसलमध्ये राहावे लागेल पण सोबतच आजूबाजूच्या परिसरात आणि बकिंगहॅम पॅलेसमध्ये काम करावे लागेल. उमेदवाराला पॅलेसचा आतील भाग आणि त्यातील वस्तूंची निगा कशी राखायची याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ही जागा कायमस्वरुपात भरण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला 13 महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि नंतर त्याला त्या पदावर कायम करण्यात येईल. उमेदवाराला इंग्लिश आणि गणित या विषयांचे ज्ञान असावे. तसे नसेल तर कामावर रुजू झाल्यानंतर काम करता करता त्याने या विषयांचे त्याने ज्ञान घेणे आवश्यक असेल. ज्यांना या आधी हाऊसकीपिंगचा अनुभव आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल असेही या जाहीरातीत म्हटले आहे.
या पदासाठी तब्बल £19,140.09 म्हणजे 18.5 लाख इतका पगार असणार आहे. त्याशिवाय या राजवाड्याच्या परिसरात त्याला राहायला मिळेल आणि वर्षातून 33 दिवस सुट्टी मिळेल. तसेच त्यांना इतर रॉयल कर्मचाऱ्यांप्रमाणे अलिशान सुविधा म्हणजे टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल आणि इतरही सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये प्रवास भत्त्याचीही सोय आहे.
परंतु हे दिसतं तितकं सोपं नाही ही भरती करण्याची जबाबदारी ज्या कंपनीवर आहे त्या सिल्वर स्वान रिक्रुटमेंट एजन्सीच्या व्यवस्थापकीय संचालिका फिलिपा स्मिथ यांच्या मते, या जागेवर योग्य उमेदवाराची निवड करणे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्याचा प्रकार आहे. रॉयल फॅमिलीत काम करताना प्रत्येक जबाबदारी ही वेगळी असते आणि उमेदवाराच्या शिक्षणापेक्षा त्याच्या प्रशिक्षणाला जास्त महत्व देण्यात येतं.
या जागेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 28 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती सुरु होतील.
यानंतर हाऊसकीपिंगच्या आणखी एका जागेसाठी भरती करण्यात येणार आहे. प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट या त्यांच्या तीन मुलांसोबत राहत असलेल्या केन्सिग्टंन पॅलेसमध्ये या जागेची भरती करण्यात येणार आहे. या जॉबचे वर्णन हे एका 'आश्वासक आणि सकारात्मक परिवारात सामिल होण्याची एक रोमांचकारी संधी' असं करण्यात आलं आहे.