ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती भयावह, या महिन्यात 1 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती
ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
ब्राझीलिया : जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा उद्रेक पहायला मिळत आहे. ब्राझीलमध्ये एका दिवसात 4 हजार 195 जणांचे मृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक बाधित देशांमध्ये ब्राझीलचा समावेश झाला आहे.
ब्राझीलमध्ये मंगळवारी कोरोनाचे 86 हजार 979 नवीन रुग्ण समोर आले आहेत. वेळीच यावर उपाययोजना केली नाही तर या महिन्यात 1 लाख ब्राझील नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली असून काही शहरांमध्ये रुग्ण उपचारांच्या प्रतीक्षेत जीव सोडत आहेत. आरोग्य यंत्रणा बर्याच भागात कोसळण्याच्या मार्गावर आहे. देशातील एकूण मृत्यूची संख्या आता जवळजवळ 337,000 झाली आहे, जी अमेरिकेनंतर दुसर्या क्रमांकावर आहे.
.. ब्राझीलच्या अध्यक्षांचा लॉकडाऊन विरोध
इतकी भयानक परिस्थिती असताना अध्यक्ष जैयर बोल्सनारो यांनी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही लॉकडाऊन उपायांना विरोध केला आहे. त्यांचा असा तर्क आहे की अर्थव्यवस्थेचे नुकसान हे विषाणूच्या परिणामापेक्षाही वाईट असेल. स्थानिक अधिकाऱ्यांनी न्यायालयांमध्ये घालून दिलेले काही निर्बंध देखील मागे घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आजपर्यंत ब्राझीलमध्ये कोरोनाव्हायरसची 13 दशलक्षाहूनही जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर मार्चमध्ये 66,570 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही संख्या मागील महिन्यात झालेल्या मृत्यूंच्या डबल आहे.
ब्राझील हा साथीचा रोग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, जर ही महामारी नियंत्रणाखाली आली नाही तर जगही सुरक्षित होणार नाही. कारण, इथं प्रत्येक आठवड्याला नवीन स्ट्रेन तयार होत असून हे व्हेरियंट जगभरात पसरतील. परिणामी ब्राझीलमध्ये संसर्ग थांबवणे ही संपूर्ण जगाचीच गरज बनली आहे.
प्राण्यांमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा WHO चा अहवाल
कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अवघं जग अडकलं आहे. भारतात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरसचा फैलावा सुरु झाला. कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान येथील प्रयोगशाळेतून झाली असं बोललं जात होतं. मात्र WHO ने स्वत: हे आरोप फेटाळले आहेत. वुहानच्या लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासूनच मानवाला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज डब्लूएचओने आपल्या अहवालात नमूद केला आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या हाती लागलेल्या अहवालात या बाबी उघड झाल्या आहेत.