Donald Trump rally Assassination Attempt : चिक चिक करत गोळ्या कानावर येताच किंकाळ्या अन् सुरक्षा रक्षकांचे क्षणात ट्रम्प यांना रिंगण; अवघ्या 12 सेकंदातील थराराने अंगावर शहारे
Donald Trump rally Assassination Attempt : अमेरिकेत 52 वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला झाला आहे. यापूर्वी 1972 मध्ये जॉर्ज सी वॉलेस यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती.
Donald Trump rally Assassination Attempt : अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करून हत्येचा प्रयत्न झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियातील बटलरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजूने गोळी घासून गेली. गोळी लागताच ट्रम्प खाली बसले. त्यांचा चेहरा रक्ताने काहीसा माखला होता, पण नंतर ट्रम्प मूठ आवळून निश्चयी असल्याचे दाखवून दिले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ते सुरक्षित आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली. तेव्हा अमेरिकेत शनिवारी संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील बटलर शहरात ट्रम्प निवडणूक रॅली करत होते.
गोळीबार होताच काय घडलं?
ट्रम्प स्टेजवर भाषण देत असताना take a look at what Happens म्हणत असतानाच चिक चिक करत गोळीबाराचे आवाज आले. तेव्हा एकच आक्रोश निर्माण झाला. ट्रम्प यांच्या दिशेने गोळी येताच त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागावरून घासून गेली. यानंत एका क्षणात ट्रम्प खाली बसले. तेव्हाच सुरक्षा रक्षकांनी त्यांना रिंगण करत बाजूला केले. तेव्हा कान आणि चेहरा रक्ताने माखलेला होता. अवघ्या 12 सेकंदामध्ये हा प्रकार घडला.
we’re witnessing history guys omg they rlly shot donald trump pic.twitter.com/FlN7qf0eJD https://t.co/xg75nTHQ6t
— jesse (@solsrvca) July 13, 2024
या गोळीबारात रॅलीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 2 गंभीर जखमी झाले आहेत. पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी सांगितले की ट्रम्प यांना सुमारे 400 फूट अंतरावरील इमारतीच्या छतावरून गोळीबार करण्यात आला. AR-15 रायफलमधून 8 राउंड फायर करण्यात आले. पहिल्या फेरीत 3 तर दुसऱ्या फेरीत 5 गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले की, संशयित शूटर मारला गेला आहे. त्याचे वय 20 वर्षे होते. हल्ल्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही.
52 वर्षांनंतर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर हल्ला
अमेरिकेत 52 वर्षांनंतर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला झाला आहे. यापूर्वी 1972 मध्ये जॉर्ज सी वॉलेस यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवारही होते. एका शॉपिंग सेंटरमध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर ते मरेपर्यंत व्हील चेअरवरच राहिले. 1972 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे भाऊ रॉबर्ट एफ केनेडी यांच्यावर हल्ला झाला होता. लॉस एंजेलिसमधील निवडणूक प्रचार आटोपून ते परतत होते.
हल्लेखोर ट्रम्प यांच्याच पक्षाचा
अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने म्हटले आहे की, हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रुक्सच्या मतदार ओळखपत्रावरून तो ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा असल्याचे दिसून आले आहे. तथापि, त्यांनी 15 डॉलर्स म्हणजे 1250 रुपये बिडेनच्या डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित असलेल्या एका गटालाही दान केले होते. ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव मॅथ्यू क्रुक्स असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियावर 20 वर्षीय क्रोक्सचा फोटो-व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, आतापर्यंत अमेरिकन पोलीस किंवा एफबीआयने या फोटो-व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही.
ट्रम्प सुरक्षित, रुग्णालयातून बाहेर
हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या टीमने म्हटले आहे की ते अधिक मजबूत आणि त्यांच्या लक्ष्यासाठी समर्पित आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत हल्लेखोराची ओळख उघड करणार नाही, अशी माहिती पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष बिडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलले
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या घटनेच्या सुमारे 4 तासांनंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की अध्यक्ष बिडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो आणि बटलरचे महापौर बॉब डँडॉय यांच्याशीही बोलले आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, राष्ट्राध्यक्ष आज वॉशिंग्टन डीसीला परतत आहेत. ते रविवारी सकाळी व्हाईट हाऊसमध्ये होमलँड सिक्युरिटी आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतील.
इतर महत्वाच्या बातम्या