(Source: ECI/ABP News/ABP Majha)
US Elections 2020 | 24 कोटी अमेरिकन मतदार नवा अध्यक्ष निवडणार, ट्रम्प-बायडेन यांच्यात कांटे की टक्कर!
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. 24 कोटी अमेरिकन नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील.अमेरिकेच्या आतापर्यंतच्या 225 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वयोवृद्ध उमेदवारांमध्ये निवडणूक होत आहे. व्हाईट हाऊसवर दुसऱ्यांदा कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले डोनाल्ड ट्रम्प 74 वर्षांचे आहेत आणि त्यांचे विरोधक ज्यो बायडेन हे 77 वर्षाचे आहेत.
वॉशिंग्टन : जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांचं मोठं आव्हान आहे. त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. अमेरिकन वेळेनुसार सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजता अमेरिकेत मतदानाला सुरुवात होईल.
24 कोटी मतदार करणार मतदान निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जवळपास 9.2 कोटी मतदारांनी आधीच त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. अमेरिकन माध्यमांच्या रिपोर्टनुसार अमेरिकेत एकूण लोकसंख्येच्या 25.7 कोटी मतदार हे 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत. त्यामध्ये जवळपास 24 कोटी मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील.
या निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. कोण निवडून येणार त्याचा अंदाज मतदान झाल्यानंतर लगेच समजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मेल आणि पोस्टल बॅलेट पेपरच्या मतदानात वाढ झाली आहे. पेन्सिलवेनिया आणि मिशिगनमधील अधिकाऱ्यांच्या मते निवडणुकीच्या मतमोजणीसाठी तीन दिवस लागतील असा अंदाज आहे.
जर 48 राज्यांच्या निवडणुकांचे परिणाम समोर आले तर या दोन राज्यांच्या मेल आणि पोस्टल बॅलेट पेपरच्या या मतदानाला जास्त काही महत्व राहणार नाही. जर या दोन उमेदवारांत तुल्यबळ लढत असेल तर मात्र या मेल आणि पोस्टल मतदानाला महत्व येईल.
इतिहासातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष निवडूण येणार अमेरिकेच्या आतापर्यंतच्या 225 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन सर्वात वयोवृद्ध उमेदवारांमध्ये निवडणूक लढत होत आहे. व्हाईट हाऊसवर दुसऱ्यांदा कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले डोनाल्ड ट्रम्प 74 वर्षांचे आहेत आणि त्यांचे विरोधक ज्यो बायडेन हे 77 वर्षाचे आहेत. जॉर्ज वॉशिग्टन यांच्यापासून आतापर्यंत सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला या निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार आहे.
भारतीय-अमेरिकन मतदारांची महत्वाची भूमिका अमेरिकेच्या निवडणूकीत भारतीय वंशाच्या मतदारारांची संख्या ही मोठी आहे आणि ते या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून आपण भारताचे जवळचे मित्र असल्याचे भासवले जात आहे. पारंपरिकदृष्ट्या भारतीय वंशाच्या मतदारांचा डेमोक्रॅटिक पक्षाकडे कल असतो, पण यावेळी दोन्ही पक्षांनी या मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केल्याने भारतीय वंशाच्या मतदारांचा कल अद्याप स्पष्ट झाला नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या मूळच्या भारतीय वंशाच्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: