(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लक्षणं न आढळणारे कोरोना रुग्णही ओळखणार, स्वित्झर्लंडच्या अँटीबॉडी चाचणीला अमेरिकेची मंजुरी
कोविड 19 ची लागण झालेल्यांसह, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, परंतु लक्षणं दिसलेली नाहीत, अशा रुग्णांबाबतही माहिती मिळणारी अँटीबॉडी चाचणी विकसित केल्याचा दावा रॉश कंपनीने केला आहे.
झ्युरिच : स्वित्झर्लंडची फार्मस्युटिकल कंपनी रॉशला अँटीबॉडी चाचणी करण्यासाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडून मंजुरी मिळाली आहे. चाचणीचं उत्पादन वर्षअखेरपर्यंत दुप्पट करण्याचा कंपनीचा उद्देश असल्याचं रॉशचे डायग्नोस्टिक्स प्रमुख थॉमस शिनेकर यांनी सांगितलं. प्रतिमहिना पाच कोटीवरुन 10 कोटी चाचणीचं उत्पादन करणार असल्याचं ते म्हणाले.
कोविड 19 ची लागण झालेल्यांसह, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, परंतु लक्षणं दिसलेली नाहीत, अशा रुग्णांबाबतही माहिती मिळणारी अँटीबॉडी चाचणी विकसित केल्याचा दावा रॉश कंपनीने काही दिवसांपूर्वीच केला होता.
जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. जगात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 35 लाख 65 हजार 310 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 48 हजार 565 वर पोहोचली आहे. तसेच या व्हायरसपासून जगभरात 11 लाख 54 हजार रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे विविध देशांमध्ये लॉकडाऊन आहे. परिणामी अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे. त्यामुळे कोरोनावर लवकराच लवकर लस शोधून तसंच टेस्टिंगचं वाढवून रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार व्हावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
कोणाला हा आजार झाला आहे, कोणाची रोगप्रतिकारशक्ती कमी असू शकते हे जाणून घेण्यासाठी सरकार, व्यवसायिक आणि प्रत्येक व्यक्ती अशा चाचणीच्या शोधत आहेत, जेणेकरुन लॉकडाऊन संपवण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातील, रणनीती आखली जाईल.
कोविड-19 चं संक्रमण ओळखण्यासाठी मॉलिक्युलर चाचणीही करणार असल्याचं रॉश कंपनीमार्फत सांगण्यात आलं आहे. अँटीबॉडी चाचणीच्या अचूकतेचा दर 99.8% टक्के असून सेन्सिटिव्हिटी 100 टक्के आहे. याचाच अर्थ या चाचणीचे निष्कर्ष फारच कमी वेळा चुकीचे येतात.
कंपनीच्या माहितीनुसार, "या चाचणीत तपासणीसाठी शिरेतून रक्ताचे नमुने घेतले जातात." "याचाच अर्थ शिरेतून रक्त घेतल्यावर जसा निकाल येतो, तसा अचूक निकाल बोटातून रक्त घेतल्यावर येणार नाही," असं शिनेकर यांनी सांगितलं.
दरम्यान रॉश कंपनीने यापूर्वीच्या आपल्या पत्रकात म्हटलं होतं की, "आम्ही एल्केसिस अँटी-सार्स-सीओवी-2 प्रणाली विकसित केली आहे, ज्यात रक्ताच्या नमुन्यांचा वापर करुन अँटीबॉडीचा शोध लागू शकते, जेणेकरुन कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीची माहिती मिळवली जाईल.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांचा शोध घेणं हा या अँटीबॉडी चाचणी मुख्य उद्देश आहे. याशिवाय काही जण ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, परंतु त्यांच्यात लक्षणं दिसत नाहीत, अशा प्रकरणांमध्येही या चाचणीचा उपयोग होऊ शकतो.