Saif al Adel : अल-आदेल अल कायदाचा नव्या म्होरक्या, जवाहिरीचा खात्मा होताच संघटनेनं निवडला प्रमुख
Saif al Adel : कुख्यात दहशतवादी अल-आदेल याची अल कायदाचा नवा म्होरक्या म्हणून निवड करण्यात आली आहे.
Saif al Adel Al Qaeda New Leader : कुख्यात दहशतवादी अल-आदेल (Saif al Adel) याची अल कायदाचा नवा म्होरक्या म्हणून निवड करण्यात आली आहे. अल कायदाचा (Al Qaeda) प्रमुख अल-जवाहिरी (Al Zawahiri) अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर लगेचच संघटनेनं नवीन प्रमुख निवडला आहे. लादेननंतरचा अमेरिकेसाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अल जवाहिरी याचा ड्रोन हल्ल्यात खात्मा झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul) सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठं यश आहे. आता अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या बनला आहे. अल आदेलचं नाव सैफ अल-आदेल (Saif al Adel) आहे.
कोण आहे सैफ अल आदेल?
- सैफ अल आदेलचा जन्म 11 एप्रिल 1960 झाला.
- सैफ अल आदेल हा इजिप्तचा रहिवासी आहे.
- 1998 मध्ये नैरोबी येथील अमेरिकन दूतावास आणि दार-ए-सलाम येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आदेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.
- अमेरिकेकडून अल आदेलवर एक कोटी डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं.
- अल आदेल अल-कायदाच्या मजलिस-ए-शूरा आणि लष्करी समितीचाही सदस्य आहे.
- सैफ अल आदेलने अल कायदाच्या दहशतवाद्यांना लष्करी आणि गुप्तचर प्रशिक्षण दिलं आहे.
- ओसामा बिन लादेननंतर अल आदेलची हंगामी नेता म्हणून निवड झाली होती. त्यानंतर अल कायदाचा प्रमुख म्हणून अल-जवाहिरीची निवड झाली.
- आता अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या बनला आहे.
जवाहिरी आणि लादेन अमेरिकेवरील 9/11 हल्ल्याचे सूत्रधार
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ड्रोनने दोन क्षेपणास्त्रे डागली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. ते म्हणाले की, कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी उपस्थित होते, परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही आणि फक्त जवाहिरी मारला गेला. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरीने अल-कायदाला आपल्या ताब्यात घेतले. तो आणि लादेन हे अमेरिकेवरील 9/11 च्या हल्ल्याचे सूत्रधार होते. जवाहिरी हा अमेरिकेच्या ‘मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट’पैकी एक होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Al-Zawahiri : उच्चशिक्षित पण धर्मांध विचारांनी बनला दहशतवादी; मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जवाहिरी होता कोण?
- Al Zawahiri Killed: अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार, बायडेन म्हणाले, "आता खरा न्याय झाला"
- Al-Zawahiri Killed: अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरीच्या मृत्यूची योजना अमेरिकेने कशी आखली? भारताला आधीच होती माहिती?