(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Al-Zawahiri : उच्चशिक्षित पण धर्मांध विचारांनी बनला दहशतवादी; मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जवाहिरी होता कोण?
Al-Zawahiri : लादेननंतरचा अमेरिकेसाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अल जवाहिरी याचा ड्रोन हल्ल्यात खात्मा झाला आहे. एक सर्जन ते मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अशी ओळख जवाहिरीची निर्माण झाली.
Al-Zawahiri : अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने (CIA) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अल-जवाहिरीला (Al-Zawahiri Killed) लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यात अल-जवाहिरी ठार झाला. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश आहे. ओसामा बिन लादेनच्या (Osama Bin Laden) खात्म्यानंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेला हा सर्वात मोठा धक्का आहे.
अल-जवाहिरीवर अमेरिकेने 25 दशलक्ष डॉलर इतक्या मोठ्या बक्षिसाची घोषणा केली होती. ओसामा बिन लादेनला अमेरिकेने 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते. त्यानंतर जवाहिरी हा अल कायदाचा प्रमुख झाला होता.
इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष सरकारला विरोध
अयमान अल-जवाहिरीचा जन्म 19 जून 1957 रोजी इजिप्तमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. व्यवसायाने सर्जन असलेल्या अल-जवाहिरीचे अरबीसह फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व होते. जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) या संघटनेची स्थापना केली होती. 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष सरकारविरोधात संघटना आक्रमक भूमिका घेत होती. धर्मनिरपेक्ष सत्ता उलथवून इजिप्तमध्ये इस्लामिक राजवट कायम ठेवण्यासाठी जवाहिरीच्या संघटनेने उद्दिष्ट होते.
लादेनसोबत ओळख कशी झाली?
अल जवाहिरी आणि ओसामा बिन लादेन यांची भेट सौदी अरेबियात झाली होती, असे म्हटले जाते. ओसामा बिन लादेन 1985 मध्ये अल कायदा संघटना वाढवण्यासाठी पाकिस्तानमधील पेशावर येथे गेला होता. त्यादरम्यान जवाहिरीदेखील तिथेच होता. त्यानंतर लादेन आणि जवाहिरी यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली.
लादेन आणि जवाहिरी एकत्र
अल-जवाहिरीने EIJ या संघटनेचे वर्ष 2001 मध्ये अल-कायदामध्ये विलीनीकरण केले. यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी मिळून जगाला हादरवण्याचा कट रचला. अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेचे नेतृत्व हाती घेतले. आणि 2011 मध्ये तो अल-कायदाचा प्रमुख बनला. 9/11 दहशतवादी हल्ल्यापासून अमेरिका अल-जवाहिरीचा शोध घेत होती.
9/11 हल्ल्यात जवाहिरीने केली होती मदत
इजिप्शियन डॉक्टर आणि सर्जन असलेल्या अल-जवाहिरीने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवरील हल्ल्यात वापरण्यात आलेल्या चार विमानांचे अपहरण करण्यात मदत केली होती. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन्ही टॉवरवर 2 विमाने धडकली. त्यानंतर अमेरिकेसह संपूर्ण जगात मोठी खळबळ उडाली. तिसरे विमान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनला धडकले. चौथे विमान शँकव्हिले येथील शेतात कोसळले. या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे तीन हजार लोक मारले गेले. या दहशतवादी हल्ल्याशिवाय, अल-जवाहिरीवर 12 ऑक्टोबर 2000 रोजी येमेनमध्ये यूएसएस कोल या अमेरिकन जहाजावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यामध्ये अल कायदाच्या आणखी एका कमांडरचा समावेश होता. या हल्ल्यात 17 अमेरिकन जवान मारले गेले आणि 30 जखमी झाले होते.
जवाहिरीच्या दहशतवादी कारवाया
अल-जवाहिरी हा वयाच्या 15 व्या वर्षी मुस्लिम ब्रदरहूडचा सदस्य झाला. लहानपणापासून धार्मिक कट्ट्ररतवादी विचारांचा त्यावर पगडा निर्माण झाला होता. अल जवाहिरी हा 1981 मध्ये इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येत सामील होता. लादेनसोबत ओळख झाल्यानंतर या दोघांनी मोठ्या दहशतवादी कारवाया केल्या. केनिया आणि टांझानिया येथे 1998 मध्ये अमेरिकन दूतावासांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात जवाहिरीचा हात होता. त्याशिवाय, 2000 मध्ये येमनच्या बंदरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही त्याचा हात होता असे म्हटले जाते. अमेरिकेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवाहिरी हा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर तो अल-कायदाचा प्रमुख झाला.