(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taliban : अफगाणिस्तानमध्ये मुलींना शिक्षण मिळणार? तालिबानने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
Taliban News : अफगाणिस्तानमध्ये पुढील आठवड्यांपासून मुलींसाठी शाळा कॉलेज सुरू होणार असून त्यासाठी तालिबानने काही अटी लागू केल्या आहेत.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून सत्ता ताब्यात घेणाऱ्या तालिबानने मुलींच्या शिक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये देशातील मुलींसाठी शाळा-महाविद्यालये सुरू करणार असल्याची घोषणा तालिबानने केली आहे. मात्र, मुलींना शिक्षणासाठी तालिबानच्या अटींचा अडथळा पार करावा लागणार आहे.
तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर महिला शिक्षण आणि त्यांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू होती. तालिबान सरकारचे शिक्षण मंत्री असलेले अझीज अहमद रयान यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात मुले आणि मुलींसाठी शाळा-कॉलेज सुरू होणार आहे. मात्र, मुले आणि मुलींनी वेगवेगळ्या शाळा-कॉलेजमध्ये शिकावं लागणार असल्याची अट तालिबानने घातली आहे. मुलींच्या शाळेत फक्त महिला शिक्षक असतील. त्याशिवाय कोणतीही महिला बुरख्याशिवाय घराबाहेर पडणार नाही.
वृद्ध शिक्षकांची होणार नियुक्ती
अफगाणिस्तानमधील दुर्गम भागात जिथे शिक्षकांची कमतरता आहे, तिथे वृद्ध पुरुष शिक्षकही मुलींना शिकवू शकतात, असे तालिबान सरकारने म्हटले. यावर्षी एकही शाळा बंद होणार नसल्याचे अहमद यांनी म्हटले.
तालिबानकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा सुधरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर जगातील अनेक देशांनी तालिबानला सरकारी दर्जा दिला नाही. त्याशिवाय त्यांना दहशतवादी संघटना मानतात. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक कायदा लागू केला आहे. एवढेच नाही तर कोणतीही महिला एकटी बाहेर जाणार नाही, असा आदेशही त्यांनी काढला आहे. स्त्रीला एकटीने घराबाहेर पडण्यास मज्जाव असून सोबत पुरुष हवा असा आदेश तालिबान सरकारने काढला आहे.
काही प्रांतात महिलांना काम करण्यास मज्जाव
तालिबानच्या राजवटीत काही प्रांतांमध्ये महिलांना काम करण्याची परवानगी नाही. महिलांना केवळ आरोग्य विभागात काम करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तालिबानच्या राजवटीत महिलांच्या हक्कांचे हनन होत असल्याचा मुद्दा समोर येत आहे.