Serbia School Shooting: धक्कादायक! सातवीतल्या मुलाकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षक ठार
Serbia Crime News: युरोपियन देश सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथील एका शाळेत सातवीतल्या मुलाने गोळीबार केला आहे. या गोळीबारात अनेक विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Serbia School Shooting: युरोपियन देश सर्बिया (Serbia) मध्ये जीवघेणा गोळीबार झाला आहे. बेलग्रेड (Belgrade) येथील एका शाळेत सातवीतल्या मुलाने गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ विद्यार्थी आणि एका सुरक्षा रक्षकाचा (Security Guard) समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय अनेक जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्बियाच्या गृह मंत्रालयाने या घटनेची माहिती दिली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गोळीबार झाल्याचे समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहा विद्यार्थी आणि एक शिक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे.
राजधानी बेलग्रेडच्या शाळेत गोळीबार
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलग्रेड (Belgrade) मधील व्लादिस्लाव रिबनीकर शाळेत आज (बुधवार, 3 मे) सकाळी गोळीबार झाला. जिथे अनेक विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी 14 वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की संशयितावर त्याच्या वडिलांची बंदूक वापरल्याचा आरोप आहे. या घटनेमागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
अल्पवयीन मुलाने झाडल्या गोळ्या!
गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, शाळेत गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. शाळेतून एका संशयित अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुलगा हा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी आहे, त्याने आपल्या वडिलांची बंदूक आणून गोळीबार केल्याची माहिती मिळतेय.
व्लादिस्लाव रिबनीकर शाळेभोवतीचा परिसर पोलिसांनी सील केला आहे. सर्बियातील जीवघेण्या गोळीबाराची ही घटना धक्कादायक आहे, कारण शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्याकडून अशा प्रकारचा हिंसाचार होणे ही गंभीर बाब आहे. सर्बियाच इतक्या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचा हिंसाचार कधीच झाला नव्हता.
बेलग्रेड हे 'व्हाइट सिटी' म्हणून ओळखले जाते
राजधानी असण्याव्यतिरिक्त, बेलग्रेड हे सर्बियाचे सर्वात मोठे शहर देखील आहे. हे सावा आणि डॅन्यूब नद्यांच्या संगमावर आणि पॅनोनियन मैदान आणि बाल्कन द्वीपकल्प दरम्यान वसलेले आहे. येथे शहरी भागाची लोकसंख्या 12 लाख आहे, तर एकूण लोकसंख्या सुमारे 17 लाख आहे. हे सर्वात शांत आणि सुंदर शहरांपैकी एक आहे.
महत्त्वाच्या बातम्या: