(Source: Poll of Polls)
Nancy Pelosi: चीनची 21 लढाऊ विमाने तैवानमध्ये घुसली; नॅन्सी पेलोसींच्या तैवान भेटीने तणाव वाढला
Nancy Pelosi Taiwan Visit : अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी तैवान दौऱ्यावर आल्याने चीनचा चांगलाच तिळपापड झाला असून अमेरिकेच्या या कृतीला जशास तसं उत्तर देण्याचं त्या देशानं ठरवलं आहे.
Nancy Pelosi Taiwan Visit: अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे संतप्त झालेल्या चीनने म्हटले आहे की, अमेरिकेला याचे परिणाम भोगावे लागतील. एएफपी वृत्तसंस्थेने तैवान येथील लष्कराच्या हवाल्याने म्हटले आहे की, 21 चिनी लष्करी विमानांनी एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) मध्ये प्रवेश केला. यादरम्यान चीनने आपले KJ500 AWACS विमान आणि JF16, JF11, Y9 EW आणि Y8 ELINT विमान तैनात केले होते.
चीनचा चांगलाच तिळपापड
विरोध असतानाही अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी तैवान दौऱ्यावर आल्याने चीनचा चांगलाच तिळपापड झाला असून अमेरिकेच्या या कृतीला जशास तसं उत्तर देण्याचं त्या देशानं ठरवलं आहे. तैवानमध्ये नॅन्सी पेलोसी यांनी पाऊल ठेवल्यास तैपेई विमानतळ बॉंबने उडवून देऊ अशी धमकी चीनने अमेरिकेला दिली होती. आता नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला प्रत्युत्तर म्हणून चीनचे लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. चायनिज पीपल्स लिबरेशन आर्मी हाय अलर्टवर असून त्यांना कधीही हल्ल्याचा आदेश येण्याची शक्यता आहे.
तैवानकडे मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली
तैवानच्या प्रसारमाध्यमांनी पेलोसीच्या तैपेईमध्ये आगमनाची बातमी देताच, चीनच्या अधिकृत सोशल मीडियाने तैवानकडे मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली केल्याचे सांगितले. पेलोसींच्या तैवान भेटीच्या वृत्ताला प्रतिक्रिया देताना, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी बीजिंगमध्ये सांगितले की, " आम्ही पेलोसीच्या कार्यक्रमाचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. आणि जर त्यांनी तैवानला प्रवास केला तर आम्ही त्याचे प्रत्युत्तर देऊ." दुसर्या प्रवक्त्याने सांगितले की चीनचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि हितसंबंध कमी करण्यासाठी अमेरिका जबाबदार असेल आणि याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल. चीन परदेशी व्यक्तीच्या तैवान भेटीला सातत्याने विरोध करत आहे. चीनकडून असा दावा करण्यात येतोय की, 'वन चायना वन पॉलिसी' अंतर्गत चीन हा तैवानला आपला भाग मानतो. त्यामुळे तैवानने कोणत्याही देशासोबत संबंध ठेवण्याला चीनचा विरोध आहे. .
काय म्हणाली नॅन्सी पेलोसी?
तैवानमध्ये आल्यानंतर नॅन्सी पेलोसी म्हणाल्या की, तैवानचा दौरा अमेरिकेच्या लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या वचनबद्धतेचा सन्मान करतो. आम्ही लोकशाहीचे समर्थन करतो. त्यांनी ट्विट केले की, तैवानच्या 23 दशलक्ष लोकांसोबत अमेरिकेची एकता आज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, कारण जगाला निरंकुशता आणि लोकशाही यातील निवडीचा सामना करावा लागत आहे.
आशिया खंडावर युद्धाचे ढग
आपला तैवान दौरा हा जिवंत लोकशाहीचं समर्थन असून अमेरिका नेहमीच तैवानच्या मागे खंबीर उभी असल्याचा विश्वास अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी दिला आहे. चीनच्या बॉंबस्फोटाच्या धमकीनंतरही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये गेल्या असून उद्या त्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. नॅन्सी पेलोसींच्या या दौऱ्यामुळे चीन दावा करत असलेल्या एका लोकशाही देशामागे जगातली सर्वात जुनी लोकशाही उभी असल्याचा संदेश अमेरिकेने दिला. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे आशिया खंडावर युद्धाचे ढग जमा झाले असून कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध झालं तर या युद्धात अनेक देश ओढले जातील. चीनला रशियाने पाठिंबा दिला असून त्यांच्या बाजूने इराण या युद्धात उतरण्याची शक्यता असून अमेरिकेच्या बाजूने ऑस्ट्रेलिया, जपान युद्धात उतरतील.