Washim : हिंगोली नाक्याजवळ रेल्वे उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू; संथ गतीने चाललेल्या कामामुळे वाहनधारक त्रस्त
Washim News : वाशिमच्या हिंगोली नाक्याजवळ रेल्वे उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्याने नांदेड-वाशिम मार्ग चार तास बंद करण्यात आला होता.
Washim Road Issue : नांदेड-वाशिम महामार्गावर वाशिमच्या हिंगोली नाक्याजवळ रेल्वे उड्डाणपुलावर लोखंडी गर्डर टाकण्याचं काम रविवारी (23 जुलै) सकाळपासून सुरू करण्यात आलं आहे. यासाठी वाहतूक थांबवून या मार्गावरील रेल्वे पटरीवरील असलेल्या उड्डाण पुलावर हे लोखंडी गर्डर टाकण्याचं काम सुरू होतं. सकाळी 11 वाजल्यापासून हे काम सुरू करण्यात आलं होतं आणि दुपारी 3 वाजेपर्यंत हे काम सुरू होतं. त्यामुळे नांदेड-वाशिम हा मार्ग चार तास वाहतुकीसाठी बंद होता. गेल्या पाच वर्षापासून हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
हिंगोली नाक्याजवळ गर्डर टाकण्याचं काम
अकोला-नांदेड या चौपदरीकरण मार्गाचं काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. तर वाशिम जवळील हिंगोली नाका परिसरात असलेल्या या मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाच्या (Flyover Work) निर्मितीचं काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. गेल्या पाच वर्षापासून हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे असलेल्या तेथून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, त्याचबरोबर दुचाकी आणि छोट्या वाहनधारकांचे अपघात होण्याची संख्या वाढली आहे. तर अनेकांना मणक्याचे आणी हाडांचे आजारही जडल्याचं चित्र आहे.
संथ गतीने चाललेल्या कामामुळे वाहनधारक त्रस्त
उन्हाळ्यामध्ये धुळीने वाहनधारक त्रस्त होते, तर आता भर पावसाळ्यात पूल निर्मितीदरम्यान कच्चा रस्ता चिखलमय झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जानेवारीपर्यंत उड्डाणपूल पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याने भर पावसाळ्यात हे गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे. ऐन रविवारी (23 जुलै) वाशिमकडे येणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला असला तरी अकोला-नांदेड बायपास मार्ग मात्र सुरू असणार आहे.
रस्त्यावर अनेक मोठ-मोठे खड्डे पडले
वाशिमजवळ महामार्गावरील पाऊण किलोमीटरच्या रस्त्यात अनेक मोठ-मोठे खड्डे पडले आहेत आणि पावसामुळे त्यात चिखल साचला आहे. मोठ्या खड्ड्यांमध्ये छोट्या गाड्यांची चाकं फसत आहेत. खड्ड्यात चिखल-पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक छोट्या चारचाकी वाहनांच्या इंजिनला फटका बसत असल्याने इंजिनचं नुकसान होत आहे. तर, अनेक वाहनांचे टायर फुटण्याच्या घटना घडत आहेत.
खड्डेमय रस्त्यांमुळे मणक्याचे-हाडांचे आजार
अनेक वेळा खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अंदाज चुकत असल्याने किरकोळ अपघात होणं नेहमीचं झालं आहे. ढिम्म प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे ठेकेदार मुजोर होऊन बसला आहे आणि त्यामुळे खड्डेमय रस्त्यावर तात्पुरती डागडुजी देखील करण्यात येत नाही. रोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यांमुळे मणक्याचे-हाडांचे आजार जडत आहेत.
हेही वाचा:
Photos: तुम्हाला माहिती आहे का? जगातील 'हे' प्राणी कधीच झोपत नाहीत