(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Deshmukh : एबीपी माझाच्या बातमीचा दणका अन् खासदार संजय देशमुख यांनी इशारा देताच प्रशासनाकडून दुरुस्ती, नंगारा भवनाच्या कार्यक्रमपत्रिकेत बदल
Sanjay Deshmukh : खासदार संजय देशमुख यांनी काल एबीपी माझासोबत बोलताना पोहरादेवी येथील नंगारा भवनाच्या कार्यक्रमपत्रिकेत नाव नसल्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं होतं.
वाशिम : पोहरादेवी येथे होणाऱ्या नंगारा भवनाच्या उद्घाटनाला यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना निमंत्रण नसल्याची बातमी एबीपी माझानं प्रसिद्ध केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी या प्रकरणारवरुन महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला होता. एबीपी माझाच्या बातमीचा दणका बसल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग आली असून पोहरादेवी येथील नंगारा भवनाच्या लोकार्पण कार्यक्रम पत्रिकेत संजय देशमुख यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
एबीपी माझाच्या बातमीचा दणका बसल्यानंतर अखेर पोहरादेवी येथील नंगारा भवनाच्या लोकार्पण कार्यक्रम पत्रिकेत खासदार संजय देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे. आज नंगारा भवनाचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या नव्या मुख्य पत्रिकेत संजय देशमुख यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. खासदार संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत. खासदार संजय देशमुख यांना कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याची बातमी सर्वात आधी 'एबीपी माझा' ने प्रसारित केली होती. ' एबीपी माझा'च्या बातमीनंतर आयोजकांकडून नव्याने पत्रिका प्रसारित करण्यात आली असून मुख्य पत्रिकेत आणि विशेष निमंत्रितांच्या यादीत आता खासदार संजय देशमुख यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
संजय राठोड यांच्यावर टीका
पोहरादेवीचा कार्यक्रम म्हणजे महायुती आणि संजय राठोड यांचा इव्हेंट असल्याची टीका खासदार संजय देशमुख यांनी केली होती.आपण निमंत्रणाबाबत प्रोटोकॉल संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. या संपूर्ण प्रकाराची तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करणार असल्याचं खासदार संजय देशमुख यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं होतं. संपूर्ण कार्यक्रमावर कोट्यवधींची उधळपट्टी केली जात असल्याची टीका खासदार देशमुख यांनी केली होती. मंत्री संजय राठोड यांना आपल्या नावाची ऍलर्जी असल्याचा टोला खासदार संजय देशमुख यांनी लगावला होता.
बंजारा महंतांना नरेंद्र मोदी भेटणार...
बंजारा समाजाचे महंत यांना नरेंद्र मोदी भेटणार असून त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याकरिता 15 मिनिटांची वेळ देण्यात आला आहे. आधी महंतांना कुठलेही आमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे महंत नाराज होते. आता मात्र त्यांना भेटण्याकरिता 15 मिनिटांची वेळ देण्यात आली आहे. काल महंतांनी निमंत्रण नसल्याने नाराजी व्यक्त केली होती.
इतर बातम्या :