Ramdas Athawale : पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार ही काँग्रेसची अफवा; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य
Ramdas Athawale On Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे संविधान बदलणार आहेत ही निव्वळ अफवा आहे, जनतेने काँग्रेसच्या अफवेला बळी पडू नये, असे आवाहन राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
वाशिम: पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) हे भारताचे संविधान बदलणार आहेत ही म्हणजे निव्वळ अफवा आहे. देशात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मिळून समाजात गैरसमज पसरवत आहेत. ही एक काँग्रेसची (Congress) खेळी असून जनतेने काँग्रेसच्या या खेळीला बळी पडू नये. कारण संविधान बदलणे हे कुणालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. पंतप्रधानांनी संसद भवनाला संविधान सदन असे नाव दिले आहे. त्यामुळे जनतेने काँग्रेसच्या अफवेला बळी पडू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले. आज वाशिम येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने भूमी हक्क परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
देशाचे संविधान बदलणे कधीही शक्य नाही. ही निव्वळ अफवा
देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. अशातच, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज 15 जानेवारीला वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी रामदास आठवले बोलत होते. 2024 मध्ये देशात परत एकदा नरेंद्र मोदींच पंतप्रधान होतील. त्यामुळे देशात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मिळून समाजात गैरसमज पसरवीत आहे. संविधानाला अनुरूप कार्य मोदी सरकारने केले असून काँग्रेसने फक्त दलितांचे मते घेण्याचे काम केले आहे. देशाचे संविधान बदलणे कधीही शक्य नाही. ही निव्वळ अफवा असल्याचे आठवले म्हणाले.
अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली
यावेळी रामदास आठवले यांना अकोल्याची जागा तुम्ही मागणार का? असा प्रश्न विचारला असता, तेव्हा अकोल्याची जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं मोठं वक्तव्य त्यांनी केल. तसेच, प्रकाश आंबेडकरांना आम्हाला पाठिंबा दिल्यास, आम्हीही त्यांना पाठिंबा देऊ, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी दिलेला बारा बारा जागांचा फॉर्म्युला महाविकास आघाडीनं स्विकारावा, जर त्यांनी दिलेला फॉर्म्युला स्विकारला, तर आम्हाला त्यांचे बारा वाजवण्यात यश येईल, असा टोला देखील रामदास आठवलेंनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
अकोल्यात संभाव्य लढतीचं चित्र अद्याप अस्पष्टच
प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'चा समावेश 'महाविकास' आणि 'इंडिया अघाडी'त होतो की नाही?, समावेश न झाल्यास अकोला लोकसभा काँग्रेस किंवा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार?, की आघाडी न झाल्यानंतरही महाविकास आघाडी न मागता आंबेडकरांना पाठींबा देणार?, या सर्वच शक्यता सध्या अधांतरी आहेत. त्यासोबतच धोत्रे आजारी असल्याने भाजपला नवा उमेदवार द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. आंबेडकर जरी लढणार असले, तरी ते एकटे लढतात की महाविकास आघाडीत यावर निवडणुकीचं चित्र ठरणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार या मुद्द्यांवर संभ्रमाचं वातावरण असल्यानं अकोल्यातील संभाव्य लढतीचं चित्र अद्यापही अस्पष्टच आहे. मात्र, 2024 चा लोकसभेचा अकोल्यातील रणसंग्राम राज्यासाठी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या