(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे युवकाचे प्राण वाचले, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद
Wardha News : वर्धा रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान भागवत बाजड हे देवदूत बनून धावून आल्यामुळे नितीन याचे प्राण वाचले. भागवत बाजड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नितीन याला मरणाच्या दारातून खेचून आणले.
Wardha News Update : धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून पडलेल्या युवकाचे आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहेत. नितीन ढगे असे प्राण वाचलेल्या 26 वर्षीय युवकाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला झाला आहे. वर्धा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ही थरारक घटना घडली आहे.
वर्धा रेल्वे स्थानकावरून अकोल्याला जाण्यासाठी नितीन हा रेल्वेची वाट पाहत थांबला होता. अकोल्याला जाण्यासाठी त्याला सुपरफास्ट एक्सप्रेस पकडायची होती. त्यामुळे रेल्वे फलाटावर आल्यानंतर तो रेल्वे पकडण्यासाठी धावत येत होता. तेवढ्यात रेल्वे फलाटावरून निघाली होती. त्यामुळे नितीनची धांदल उडाली आणि त्याने चालती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात रेल्वेचा वेग वाढला. चालत्या रेल्वेगाडीत चढण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय घसरला. त्यामुळे तो फलाट आणि रेल्वेच्या गॅपमध्ये अडकला. नितीन रेल्वेसोबत घासत जाऊ लागला. हे दृष्य पाहून स्थानकावरील प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यामुळे स्थानकावरील आरपीएफच्या जवानाने धावत जावून नितीनला खेचून बाजुला काढले.
फलाटावर कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान भागवत बाजड हे देवदूत बनून धावून आल्यामुळे नितीन याचे प्राण वाचले. भागवत बाजड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नितीन याला मरणाच्या दारातून खेचून आणले. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. युवकाला वाचवणाऱ्या आरपीएफ जवानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्रवाशांनी धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करू नये
प्रवाशांनी धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे रेल्वेची वेळ बघून नागरिकांनी थोडा वेळ आधी फलाटावर उपस्थित राहावे आणि अपघात होण्यापासून सावधानता बाळगावी असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.