(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha–Nanded Railway line : वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण, पीएम मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
Wardha–Nanded Railway line : वर्धा - यवतमाळ - नांदेड या विदर्भाला मराठवाड्याशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
Wardha–Nanded Railway line : वर्धा - यवतमाळ - नांदेड या विदर्भाला मराठवाड्याशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा ते यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या ठिकाणापर्यंत 42 किलो मीटरचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळेच 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत या पहिल्या टप्प्यातील कामाचे ई लोकार्पण होणार आहे. वर्धा ते नांदेड हा रेल्वे मार्ग नेमका कसा आहे आणि तो नागरिकांच्या फायद्याचा कसा ठरणार हे जाणून घेऊयात...
रेल्वे मार्गाला सण 2009 मध्ये मंजुरी मिळाली
वर्धा - यवतमाळ - नांदेड या रेल्वे मार्गाला सण 2009 मध्ये मंजुरी मिळाली. जमीन अधिग्रहण आणि विविध बाबी पूर्ण करीत 2015 ला काम सुरू झाले. बऱ्याचदा या कामाच्या संथ गतीचा मुद्दा देखील लोकसभेत गाजला. 2016 मध्ये कामाला गती आली आणि आता या रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे.
284 किलोमीटरचे अंतर केवळ साडेचार तासात
वर्धा ते नांदेड हे 284 किलोमीटरचे अंतर केवळ साडेचार तासात या रेल्वे रुळामुळे कापता येणार आहे. रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर व्यवसाय वृद्धीला देखील चालना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात वर्धा ते कळंब पर्यंत काम पूर्ण झाले आहे. या मार्गात देवळी, भिडी, कळंब ही रेल्वे स्थानक बांधण्यात आलीय. येथे विविध सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या आहे. या मार्गावर रेल्वेगाडीची ट्रायल देखील घेण्यात आली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला भरारी देणारा रेल्वे मार्ग ठरणार : खासदार रामदास तडस
वर्ध्याहून नांदेडला पोहचायला बसने दहा तास लागतात, या रेल्वे मार्गाने मात्र साडेचार तासात पोहचणे शक्य होणार आहे. वर्धा यवतमाळ आणि नांदेड हे तिन्ही जिल्हे कपाशीची मोठी बाजारपेठ आहे, येथे कापूस उद्योग देखील आहेत. हा रेल्वे मार्ग व्यापार आणि उद्योग वाढीसाठी देखील फायद्याचा ठरावा अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे. वर्ध्यापासून तर नांदेडपर्यंत वर्धा, देवळी, भिडी, कळंब, यवतमाळ, लसीना, तापोना, पुसद, अर्धापुर आणि नांदेड अशी स्थानके असणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला भरारी देणारा रेल्वे मार्ग ठरणार आहे, असे खासदार रामदास तडस म्हणाले आहेत. पहिल्या टप्प्यातील कामाचे ई लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. वर्ध्यात या रेल्वे मार्गाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. लवकरच वर्धा ते कळंब असा प्रवास नागरिक करू शकणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या