Wardha News : जखमी अस्वलावर यशस्वी उपचार, 20 दिवसांच्या उपचारानंतर सोडले नैसर्गिक अधिवासात
टिपेश्वर अभयारण्यालगत वनपरिक्षेत्रात जखमी अवस्थेत आढळलेल्या अवाढव्य नर अस्वलावर (bear) यशस्वीरित्या उपचार केले आहेत. उपचारानंतर परत एकदा अस्वलाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
Wardha News : टिपेश्वर अभयारण्यालगत वनपरिक्षेत्रात जखमी अवस्थेत आढळलेल्या अवाढव्य नर अस्वलावर (bear) यशस्वीरित्या उपचार केले आहेत. उपचारानंतर परत एकदा अस्वलाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. तब्बल 20 दिवस अस्वलावर उपचार करण्यात आले. वर्धाच्या करुणाश्रमातील कर्मचाऱ्यांनी 'मुन्ना' असं त्या अस्वलाचे नाव ठेवले होते.
दरम्यान, 5 ऑगस्ट 2022 रोजी टिपेश्वर अभयारण्यालगत यवतमाळ जिल्ह्यातील पंढरकवड्यातील पारवा वनक्षेत्रात एक अस्वल जखमी असल्याचे दिसून आले होते. वर्ध्याच्या करुणाश्रमातील पीपल फॉर एनिमल्स च्या वन्यप्राणी बचाव पथकाला रात्री 1 वाजता पाचारण करण्यात आले होते. जखमी असलेल्या आणि वेदनेनं विव्हळत असलेल्या अस्वलाला लवकरात लवकर बंदिस्त करणे आवश्यक होते. कारण जंगलालगतच्या गावकऱ्यांना यापासून धोका निर्माण झाला असून गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष पेटला होता. अशातच पांढरकवडा वनविभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या नेतृत्वाखाली या अस्वलाला उपचारासाठी बंदीस्त करण्याची मोहीम सुरू झाली होती. तब्बल 20 दिवसांच्या उपचारानंतर आणि जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर अस्वलाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
उपचार आणि बचाव मोहिम राबवण्यात यावी यासाठी वर्धा करुणाश्रमातील पीपल फॉर एनिमल्सच्या वन्यप्राणी बचाव पथकाला पाच ऑगस्टला रात्री 1 वाजता पाचारण करण्यात आले होते. या अवाढव्य अस्वलाचा वावर नाल्याजवळ असल्यानं वन विभागानं रात्री तिथेच पिंजरा लावला होता. पण रात्र असल्यानं जंगलात जोखीम पत्करुन सदर चमूला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. वनविभाग व करुणाश्रमातील चमू मार्फत संयुक्त रित्या राबवण्यात आलेल्या या बचाव मोहिमेला सलग 3 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अस्वलाला बंदीस्त करण्यात यश आले होते.
अस्वलाला अनेक जखमा झाल्या होत्या
अस्वलाच्या डोक्याला ठिक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. या जखमा जुन्या असल्यानं त्यात जंतू देखील झाले होते. करुणाश्रमातील चमूने त्याच ठिकाणी प्राथमिक उपचार करुन सदर अस्वलाला पुढील उपचाराकरिता करुणाश्रम पीपल फॉर एनिमल्स संचालित वन्यप्राणी बचाव केंद्रात हलवले होते. सदर अस्वलाचे वय अंदाजे 13 ते 14 वर्ष असल्याचे समजते. जखमांमध्ये जंतू पडल्यामुळे अस्वलाची वर्तवणूक आक्रमक होती. उपचरादारम्यान 3 ते 4 दिवस त्याने अन्न सुद्धा खाल्ले नाही. जखम भरत गेली तसे अस्वलाच्या वर्तनातही बदल होत गेला. 20 दिवसांच्या उपचारानंतर आणि जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतर अस्वलाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. ही संपूर्ण मोहीम पांढरकवडा उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक वनसंरक्षक एस. आर. दुमरे, रवींद्र कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी राबवली.
महत्त्वाच्या बातम्या:
वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ अस्वलाने लक्ष वेधलं, प्राणीप्रेमींमध्ये उत्सुकता