(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wardha News : वर्धा जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला भीषण आग; चार जनावरांचा होरपळून मृत्यू
Wardha News : वर्धा जिल्ह्यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गोठ्यात असलेल्या पाच जनावरांपैकी चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Wardha News : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील रेणकापूर येथील शेतकरी आत्माराम निखाडे (Atmaram Nikhade) यांच्या घराजवळ असलेल्या गोठ्याला गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत गोठ्यात असलेल्या पाच जनावरांपैकी चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, एक बैल गंभीर जखमी झाला आहे. नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नसल्याने अग्निशमन दलाच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेती उपयोगी साहित्याची राखरांगोळी
या आगीत गोठ्यामध्ये शेतीसाठी उपयोगी असणारे साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच, गोठ्याला घर अगदी लागून असल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्रिज, पंखा यांसह इतर अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच पावसामुळे संकटात अडकलेल्या शेतकऱ्याचे अशा प्रकारे नुकसान झाल्याने या गोष्टीची दखल घेत सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.
आग विझवताना गंभीर दुखापत
घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केले होते. पाण्याच्या टँकरने आग विझविण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. अखेर अग्निशमन दलाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आग विझवताना शेतकरी आत्माराम निखाडे आणि मुलगा आशिष निखाडे यांना गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला आहे.
संकटांची मालिका सुरुच
संपूर्ण महाराष्ट्रासह वर्धा जिल्ह्यातही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच संकटात अडकलेल्या शेतकऱ्याचे अशा प्रकारे नुकसान झाल्याने या गोष्टीची दखल घेत सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :