(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Valentine Day: राजीव गांधी आणि सोनियांची प्रेमकहाणी
Valentine day 2023: एका अत्यंत साधी जीवनशैली असलेल्या तरुण आणि तरुणीची प्रेमाची ही छोटीशी कहाणी अत्यंत रोमांचक आहे.
Valentine Day Special: आज व्हॅलेंटाईन डे... अर्थात प्रेमाचा दिवस... प्रेमी युगुलांसाठी व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2022) खूप खास आणि महत्त्वाचा आहे. आज 14 जानेवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे अतिशय उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा आम्ही वाचकांच्या पसंतीस पडलेले काही लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत.
'पहिल्यांदा आमची जवळून नजरानजर झाली. मी माझ्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज ऐकू शकत होते. माझ्या मते, हे पहिल्या नजरेतलं प्रेम होतं. नंतर राजीव यांनी मला सांगितलं की त्यांच्या दृष्टीनेही हे लव्ह अॅट फर्स्ट साईट होतं.' राजीव तिला फिरायला घेऊन जायला लागले. काहीच दिवसात ते एकमेकांच्या जवळ आले. नदीकाठी सहलीला आणि संगीताच्या कॉन्सर्टला ते एकत्र जायला लागले. एका अत्यंत साधी जीवनशैली असलेल्या तरुण आणि तरुणीची प्रेमाची ही छोटीशी कहाणी अत्यंत रोमांचक आहे.
राजीव केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. त्याचवेळी एक इटालियन युवती इंग्रज कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून राहून शिक्षण पूर्ण करत होती. तिला सारखा एकटेपणा छळायचा आणि घरच्यांची राहून राहून आठवण यायची. इंग्रजांच्या शहरात राहून इंग्रजी न येणं ही मोठी अडचण भरीस भर होतीच. इटालियन पदार्थांच्या शोधात ती एका कॉन्टिनेंटल रेस्टॉरंटमध्ये गेली. तिथे तिला मायदेशातील पदार्थ तर नाही मिळाले, पण एका युवकाशी तिची भेट झाली. त्याचं नावं होतं राजीव. वर्सिटी नावाच्या रेस्टॉरंटमध्ये केम्ब्रिजमधले विद्यार्थी दररोज संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी यायचे. विद्यार्थ्यांच्या गोंधळात तिचं लक्ष मात्र राजीवकडेच खिळलेलं असायचं. मोठे काळेभोर डोळे, निरागस आणि मनमोहक हास्य असलेला तरुण, असं राजीवचं वर्णन सोनिया करतात.
ज्यादिवशी मनात प्रेमाचा अंकुर रुजला, तोच आपला व्हॅलेंटाईन्स डे
सोनियाही राजीवपेक्षा काही कमी आकर्षक नव्हत्या. जर्मनीहून आलेल्या एका कॉमन मित्राच्या मदतीने राजीवने सोनियाशी ओळख वाढवली. क्रिश्चियन फाडफाड इटालियन बोलायचा. लंच घेताना त्याने सोनिया आणि राजीव यांची ओळख करुन दिली. सोनियांना व्हॅलेंटाईन डेचं फारसं कौतुक नाही. खरं तर तेव्हाच राजीवनी त्यांना प्रपोज केलं. मात्र ज्यादिवशी दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर रुजला, तोच आपला व्हॅलेंटाईन्स डे, असं सोनिया मानतात.
प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे लग्न
प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे लग्न. मात्र हा पल्ला गाठणं राजीवसाठी सोपं नव्हतं. एका वर्षाने राजीव सोनियांच्या वडिलांच्या भेटीसाठी ऑरबेसेनोला गेले. सोनियांचे वडील अर्थात मैनो स्टीफेनोशी त्यांची भेट झाली. राजीव यांनी भेटीत थेट मुद्द्याला हात घातला. मला तुमच्या मुलीचा हात हवा आहे, अशी मागणीच घातली. स्टीफेनोंचा मात्र परदेशी व्यक्तीवर विश्वास नव्हता. आपल्या मुलीशी लग्न करण्याचा राजीवचा निर्धार त्यांनी हेरला, मात्र आपली मुलगी अख्खं आयुष्य भारतात कसं घालवेल, याची काळजी त्यांना लागून राहिली. राजीवची परीक्षा घेण्यासाठी स्टीफेनो यांनी एक अट घातली. एक वर्ष राजीव आणि सोनियांनी एकमेकांची अजिबात भेट घ्यायची नाही. त्यानंतर दोघांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं आहे का, याचा निर्णय घ्यावा. हे एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा वेगळं नाही. एक वर्ष एकमेकांपासून दूर राहणं, हा विरहाचा काळ राजीव आणि सोनियासाठी सर्वात कठीण होता. मात्र एक वर्षानंतर ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दोघांनीही लग्नाचा निर्णय सोनियांच्या वडिलांना ऐकवला. स्टीफेनो शब्दांना जागणारे होते. राजीवचं म्हणणं ऐकण्यावाचून त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. मात्र ते या लग्नाला हजर राहिले नाहीत.
गांधी कुटुंबाच्या परदेशी सुनेची कहाणी
आता सोनिया गांधींना संघर्षाला सामोरं जायचं होतं. इंदिरा गांधी आणि सोनिया यांची भेट लंडनमध्ये निश्चित झाली. सोनियांच्या मनात या भेटीबाबत घालमेल सुरु होती. मात्र इंडिया हाऊसमध्ये ठरलेली ही भेट पुढे ढकलली गेली. इंदिरा गांधींना सोनियांच्या भावना समजत होत्या. सोनियांना इंग्रजी बोलण्यात अडचण येईल, हे समजून त्यांनी फ्रेंचमध्ये बोलायला सुरुवात केली. इंदिरांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घेतल्याचं सोनिया सांगतात. 13 जानेवारी 1968 ला सोनिया दिल्लीला आल्या. 12 दिवसांनी एका छोटेखानी समारंभात त्यांचा साखरपुडा झाला. तिथेच त्यांच्या हातावर मेहंदी लागली. 25 फेब्रुवारी 1968 ला सफदरगंज रोडच्या लॉनवर दोघं विवाहबंधनात अडकले. देशातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी अग्रगण्य असलेल्या गांधी कुटुंबाच्या परदेशी सुनेची ही कहाणी. ही भारताची झाली आणि प्रेमावर तिने आयुष्य कुर्बान केलं.